बेळगाव लाईव्ह :बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचा एकंदर कारभार पाहता त्यांना स्मार्ट सिटीचे पुरस्कार कसे काय मिळतात? असा प्रश्न शहरवासीयांना पडत आहे. स्मार्ट सिटी योजनेमुळे बेळगाव शहराचा विकास होण्याऐवजी बऱ्याच ठिकाणी दुरवस्था होण्याबरोबरच नागरिकांच्या समस्या व गैरसोयीमध्ये भर पडत आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील शेख सेंट्रल स्कूल येथील रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या रस्त्याला लागून सायकल ट्रॅक देखील तयार करण्यात आला आला आहे. मात्र या ट्रॅकवर असलेले मेन हॉल गेल्या कित्येक दिवसांपासून खुलेच ठेवण्यात आले आहे.
सदर प्रकार सायकल स्वारांसह पादचारी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. येथील फूटपाथवरील असमांतर बसवलेले पेव्हर्स देखील पादचारी व शालेय मुलांसाठी जोखमीचे ठरत आहेत. तरी स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करावी.
खास करून दुर्घटना घडण्याची वाट न पाहता सर्वप्रथम सायकल ट्रॅक वरील खुले असलेले मेन हॉल तात्काळ बंद करावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
ग्लोब जवळील ही समस्या सोडवा
पुरस्कार विजेत्या बेळगाव स्मार्ट सिटीचे विकास काम ज्याच्या नशिबी सर्वत्र सांधे (जॉईंट्स) तर आहेतच शिवाय काँक्रीटला ठीक ठिकाणी भेगा आणि खड्डेही पडले आहेत. ज्याचा मनस्ताप समस्त वाहन चालकांना होत आहे. शहरातील अन्य रस्त्यांप्रमाणे ग्लोब सर्कल येथील रस्त्यावरील काँक्रीट आणि पेव्हर्स यांच्यामध्ये पडलेली भेग सध्या वाहन चालकांसाठी विशेष करून दुचाकी वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.
उंच व सखल झालेल्या पेअर्स आणि काँक्रीट रस्त्यामधील ही भेग वाहन चालकांसाठी अपघाताला नियंत्रण देणारी ठरत आहे. तरी स्मार्ट सिटीच्या संबंधित अभियंत्यांनी याकडे लक्ष देऊन रस्त्यावर असलेली ही भेग बुजवावी अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.