गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या बेळगाव ते धारवाड पर्यंतच्या रेल्वे मार्गाचे काम पुढील महिन्यापासून हाती घेतले जाणार असून पहिल्या टप्प्यात पूल उभारणीसह भूसंपादन प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. तथापि हा रेल्वेमार्ग सुपीक जमिनीतून नेण्याऐवजी पर्यायी मार्गाचा विचार करावा, या आपल्या मागणीशी संबंधित शेतकरी अद्यापही ठाम आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्ग व्हावा अशी मागणी केली जात आहे. मात्र विविध कारणांनी रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यास अडचणी येत होत्या. मात्र आता नैऋत्य रेल्वेने गेल्या काही महिन्यांपासून सदर रेल्वे मार्ग वेळेत पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्याचप्रमाणे या टप्प्यात धारवाड जिल्ह्यात येणाऱ्या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडली जाईल. प्रारंभी पूल उभारणी व इतर कामे हाती घेतली जाणार आहेत.
बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्गासाठी देसूर, नंदीहळ्ळी, गर्लगुंजी, के.के.कोप्प आदी भागातील सुपीक जमिनींचे भूसंपादन केले जाणार असल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची अडचण आणि होणारे मोठे नुकसान लक्षात घेऊन पर्यायी मार्गाचा विचार करावा अशी मागणी होत आहे.
बेळगाव, देसुर, के.के.कोप्प, कित्तूर, धारवाड अशा या नियोजित रेल्वे मार्गाची लांबी 73.2 कि.मी. इतकी असणार आहे. या रेल्वे मार्गावर एकूण सात रेल्वे थांब्यांसह 140 पूल असणार आहेत.
बेळगाव -धारवाड रेल्वे मार्गासाठी 335 हेक्टर जमीन भूसंपादित केली जाणारा असून रेल्वे मार्ग उभारणीसाठी एकूण 927 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे.