उप्पीटमध्ये विष घालून पत्नीने आपल्या पतीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गोरेबाळ (ता. सौंदत्ती, जि. बेळगाव) येथे उघडकीस आली आहे. याच घटनेत तेच उप्पीट खाल्ल्यामुळे पाळीव कुत्रे आणि मांजराचा मृत्यू झाला आहे.
निंगाप्पा फकीराप्पा हमानी (वय 35, रा. गोरेबाळ) असे उप्पीटामुळे अस्वस्थ झालेल्याचे नांव आहे. या प्रकरणात निंगाप्पाची पत्नी आणि तिच्या भावाविरुद्ध (निंगाप्पाचा मेहुणा) गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, विष मिश्रीत उप्पीट खाल्ल्यामुळे निंगाप्पा हा गेल्या 11 ऑगस्ट रोजी अस्वस्थ झाल्यामुळे त्याला हुबळीतील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
निंगाप्पाची पत्नी सावक्का व तिचा भाऊ फकीराप्पा लक्ष्मण सिंधूगीने संगणमताने निंगाप्पाच्या हत्येचा कट रचला होता. निंगाप्पाच्या नावे गावात दोन एकर शेती आहे. शेतजमीन हडप करण्यासाठी उप्पिटामध्ये विष घालून निंगाप्पाचा खून करण्याचे नियोजन होते. त्यानुसार गेल्या 11 रोजी निंगाप्पा याला विष घातलेले उप्पीट खायला देण्यात आले. तथापि उप्पीट खाताच त्याची प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी किम्स हुबळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
त्याची प्रकृती सध्या स्थिर नसून चौकशी दरम्यान मिळालेल्या माहिती आधारे पोलिसांनी सावक्का व फकीराप्पा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विष मिश्रित उप्पिटामुळे निंगाप्पा हमानी याची प्रकृती अस्वस्थ असताना दुसरीकडे तेच उप्पीट खाल्ल्यामुळे कुत्रे आणि मांजराचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस चौकशीत मिळाली आहे.