बेळगाव शहरातील शांताई वृद्धाश्रमाचा 25 वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी मच्छे, बेळगाव येथील निराश्रीतांच्या केंद्रामध्ये नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
हे वर्ष शांताई वृद्धाश्रमाचे 25 वे वर्ष येत्या डिसेंबरला पूर्ण होणार आहे. यानिमित्त दर महिन्याला एका आगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्याच अनुषंगाने काल रविवारी मच्छे निराश्रीतांच्या केंद्रातील 150 जणांचा सांभाळ करणारा स्टाफ व सुप्रीडेंट मल्लेशप्पा मेगडी यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, मनपा आरोग्य अधिकारी संजय डुमगोळ, शांताईचे संचालक माजी महापौर विजय मोरे, यंग बेळगाव फाउंडेशनचे अध्यक्ष ॲलन विजय मोरे, प्रभाकर नागरमुनोळी, मारिया मोरे, नागेश बोभाटे व कंत्राटदार मंजुनाथ यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह शाल आणि भेटवस्तू देऊन हा सत्कार केला गेला.
यावेळी बोलताना आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी निराश्रेतांचे केंद्र व शांताई वृद्धाश्रमाचे तोंड भरून कौतुक केले. तसेच अशा संस्थांना आम्ही सरळ हस्ते मदत करून त्यांना सहकार केला पाहिजे. मी महापालिकेच्यावतीने जी कांही मदत लागेल ती देण्यास तयार आहे, असे आश्वासनही दिले.
शहराचे माजी महापौर विजय मोरे यांनी बेळगाव शहरांमध्ये ज्या पद्धतीने आयुक्तांचे काम चाललेला आहे त्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले. मनपा आयुक्तांचे काम ‘सिंघम’च्या पद्धतीने चाललेलं आहे आणि त्यासाठी बेळगाव शहरवासीय आणि वेगवेगळ्या संस्थेच्यावतीने त्यांना सहकार्य करण्यास आम्ही कटिबंध आहोत असे अशा शब्दात मोरे यांनी मनपा आयुक्त दुडगुंटी यांना शुभेच्छा दिल्या.
सत्कार समारंभनंतर खानापूर येथील लोककला नाट्य संस्थेचे प्रमुख गजानन दरेकर आणि नागेश बोभाटे यांच्या पथकाने जवळपास एक तास भारुड, भजन व भक्ती गीते गाऊन वातावरण तल्लीन केले. यावेळी विठ्ठलाची गाणी म्हणत असताना निराश्रीतांच्या आश्रमाचे सदस्य व शांताई वृद्धाश्रमातील आजींनी नृत्य करून धमाल केली. त्यानंतर राणी रायबागी व महावीर रायबागी यांच्या हस्ते तयार केलेल्या स्वयंपाकाचे पूजन करून जवळपास 300 लोकांसाठी अन्नदानचा कार्यक्रम करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज गवळी, संतोष ममदापूर, संजय वालावलकर, नागेश बोंबाटे व त्यांचे सहकारी, मारिया मोरे, शरल मोरे, यंग बेळगाव टीमचे सर्व सदस्य त्याचबरोबर स्वयंपाकी निराश्रीतांच्या आश्रम मधील सदस्यांनी विशेष श्रम घेतले.
सत्कारासह भारुड, भजन, भक्ती गीत आणि अन्नदानाचा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल मच्छे निराश्रीतांच्या आश्रमातर्फे माजी महापौर विजय मोरे व मारिया मोरे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी ॲलन विजय मोरे यांनी प्रमुख पाहुण्यांसह सर्वांचे आभार मानले.