अंगणवाडी शिक्षिका आणि सहाय्यकांना बीएलओ कामाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे तसेच त्यांच्यावर इतर कोणतीही कामे सोपवू नयेत, अशी मागणी अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स फेडरेशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स फेडरेशनचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष ॲड. नागेश सातेरी, उपाध्यक्षा वाय. बी. शिगिहळ्ळी व मीनाक्षी कोटगी यांच्या नेतृत्वाखालील अंगणवाडी शिक्षिका आणि त्यांच्या सहाय्यकांनी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
जिल्हाधिकाऱ्यांचे सहाय्यक विजयकुमार होनळ्ळी यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. निवेदन सादर करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात उपस्थित अंगणवाडी शिक्षिका आणि कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून आपल्या मागण्यांच्या पूर्ततेची मागणी केली.
लहान 6 महिन्याच्या अर्भकापासून 6 वर्षाच्या बालकांसह गर्भवती महिलांना पौष्टिक आहार देणे, मुलांची आरोग्य तपासणी करून घेणे, नागरिकांची आरोग्य तपासणी, महिलांना सुदृढ आरोग्य आणि पौष्टिक आहार या संदर्भात माहिती देणे, त्याचप्रमाणे सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अंगणवाडी केंद्रातील 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना शाळापूर्व शिक्षण देणे ही अंगणवाडी कार्यकर्त्या (शिक्षिका) आणि त्यांच्या सहाय्यकांवर सोपवलेली मुख्य कामे आहेत.
तथापि अलीकडच्या काळात सरकार त्यांच्यावर निरनिराळ्या खात्यांची कामे सोपवत आहे. त्यामुळे अंगणवाडी कार्यकर्त्यांवरील कामाचा व्याप वाढवून त्यांचे लहान मुले आणि महिला संदर्भातील आपल्या मुख्य कामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचप्रमाणे कामाच्या अतिरिक्त ताणामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळे सध्या सोपवण्यात आलेल्या बीएलओ कामातून त्यांची मुक्तता करावी. तसेच यापुढे अंगणवाडी कार्यकर्त्यांवर अन्य कामे सोपवू नयेत. याखेरीज अनेक अंगणवाड्यांच्या जागेचे भाडे 18 महिने झाले थकीत आहे त्याची लवकरात लवकर पूर्तता केली जावी, शिवाय अंगणवाडीमधील वर्षभराचे थकित गॅस बिल देखील भरण्यात यावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना एआयटीयुसी बेळगाव तालुका अध्यक्ष गीता बोंद्रे म्हणाल्या की, सरकारने आमच्यावर बीएलओचे काम सोपविल्यामुळे आमचे अंगणवाडी कडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अंगणवाडीतील मुलांची संख्या कमी होत आहे. सीएनए सर्व्हे, मतदार यादी वगैरे कामे आम्ही करतो असे महिला व बाल कल्याण खात्याचे अधिकारी सांगत असतात. मात्र प्रत्यक्षात ती सर्व कामे अंगणवाडी कार्यकर्त्यांकडून करून घेतली जातात. आता देखील आमच्यावर बीएलओचे काम सोपविण्यात आले आहे. मात्र हे काम आम्ही कोणत्याही परिस्थितीत करणार नाही. मागील वर्षी आम्ही हे काम ऑनलाइन पद्धतीने करून पाहिले आहे. त्याचा मोबदला म्हणून आम्ही दरमहा 2 हजार रुपयांची मागणी केली होती. तथापि आम्हाला वर्षाला फक्त 7 हजार रुपये देण्यात आले आहेत. अंगणवाडी संदर्भातील कामे सोडून आमच्यावर इतराने कामे सोपविण्यात येत असल्यामुळे अंगणवाडी कार्यकर्त्यांचे मनस्वास्थ्य बिघडत आहे. कामाचा ताण वाढल्याने विविध विकार जडून अनेक अंगणवाडी कार्यकर्त्यांचे आरोग्य बिघडले आहे. मागील वर्षी आम्ही आधार लिंकचे देखील काम केले आहे.
त्याचा तर मोबदलाच मिळालेला नाही. त्यामुळे यावेळी बीएलओसह सरकारने सोपवलेली अन्य कोणतेच लेखी अथवा ऑनलाईन काम न करण्याचा निर्धार आम्ही केला आहे असे सांगून आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही बोंद्रे यांनी दिला. याप्रसंगी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षा वाय. बी. शिगिहळ्ळी, मीनाक्षी कोटगी यांच्यासह बहुसंख्य अंगणवाडी शिक्षिका आणि सहाय्यिका उपस्थित होत्या.