बेळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या झेंडा चौक भाजी मार्केटची सध्या चिखल आणि घाणीच्या दलदलीमुळे अत्यंत दुरावस्था झाली आहे. तेंव्हा महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या ठिकाणी स्वच्छतेसह आवश्यक विकासाची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी येथील व्यापारीवर्गाकडून केली जात आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या झेंडा चौक भाजी मार्केटमध्ये सध्या पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. या चिखलामध्ये टाकाऊ भाजीपाला कुजून निर्माण होणाऱ्या घाणीमुळे सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण पसरत आहे.
परिणामी या ठिकाणच्या व्यापारी आणि दुकानदारांसह खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. सध्या हे भाजी मार्केट म्हणजे दुर्गंधी चिखल, रोगजंतू अशांचे जणू आगरच बनले आहे.
बेळगावात झेंडा चौकात सांडपाणी रस्त्यावर … भाजी विक्रेत्यांना होतोय त्रास pic.twitter.com/4D9c83ffDn
— Belgaumlive (@belgaumlive) July 20, 2023
सदर भाजी मार्केट मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांची व खरेदीदारांची गर्दी असते. शहर आणि आसपासच्या परिसरातील बहुसंख्य नागरिक, गृहिणी भाजीपाला खरेदीसाठी याच भाजी मार्केटमध्ये येत असतात.
मध्यवर्ती झेंडा चौक भाजी मार्केट इतके महत्त्वाचे असून देखील त्याच्या विकासाकडे महापालिकेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे दरवर्षी या मार्केटमध्ये चिखलाची दलदल निर्माण झालेली असते. त्यामुळे भाजी विक्रेते आणि ग्राहकानाही त्रास सहन करावा लागतो. संततधार पावसामुळे आताही या ठिकाणी चिखल आणि घाणीत भाजी ठेवण्याची वेळ भाजी विक्रेत्यांवर आली असून नागरिकांनाही तीच भाजी विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
भाजी मार्केटमध्ये मोकाट जनावरांचाही उपद्रव होत असतो. एकंदर सध्याची या मार्केटची अवस्था पाहता साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी लोकप्रतिनिधींसह महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या मार्केटमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याबरोबरच येथील विकास कामे हाती घ्यावीत, अशी व्यापारी आणि भाजीपाला विक्रेत्यांची मागणी आहे.