पावसाअभावी पाणी पातळी अत्यंत खालावून चिंताजनक परिस्थितीत असलेल्या बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन जलाशयांपैकी हिडकल जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पाऊस होत असल्यामुळे जलाशयात पाण्याची आवक सुरू झाली आहे. तथापि अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
बेळगाव शहराला राकसकोप व हिडकल जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. मान्सून लांबून पावसाने दडी मारल्यामुळे या दोन्ही जलाशयांची पाणी पातळी अतिशय घटली आहे. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर जून मध्यावधीनंतर या जलाशयांमध्ये पाण्याची आवक सुरू होते.
त्यामुळे जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही जलाशय तुडुंब भरतात. मात्र यंदा जुलै महिना उजाडला तरी निराशाजनक परिस्थिती आहे. मात्र आता हिडकल जलाशय पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्यामुळे या जलाशयामध्ये 2380 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू झाली आहे.
ही आनंदाची बातमी असली तरी पिक पाण्यासाठी जोरदार पावसाची नितांत गरज आहे. राकसकोप जलाशयातील पाण्याने तळ गाठण्यास सुरुवात केल्यामुळे मृतसाठ्यातील पाणी उपसण्याची वेळ आली आहे.
या परिस्थितीत अजूनही कांही दिवस पावसाने दडी मारल्यास भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.