मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तासे गल्ली, अथणी येथे घडली असून त्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
काशिनाथ आप्पासाहेब सुतार (वय 23, रा. तासे गल्ली अथणी) असे भिंतीखाली गाडला जाऊन ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. संततधार पावसामुळे घराची भिंत अंगावर कोसळल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला.
त्याच्या मृत्यूमुळे सुतार कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. अथणीचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयाकडे धाडला.
सदर घटनेची माहिती मिळताच अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांच्यावतीने स्थानिक नेते चिदानंद सवदी यांनी सुतार कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अथणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.