बेळगाव लाईव्ह : मान्सूनने दडी मारल्याने भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिकांच्या खाण्यापिण्यावर संक्रांत आली असून भाजीपाला खरेदीमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे खिसे रिकामे होत आहेत.
गेल्या पंधरवड्यात टोमॅटोने देशभरात शंभरी गाठली असून आता टोमॅटो पाठोपाठ इतर भाजीपाल्यांचे दर देखील गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता खायचे काय आणि जगायचे कसे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सतावतो आहे. १०० ते ११० रुपयांच्या घरात किरकोळ बाजारात विक्री करण्यात येणाऱ्या टोमॅटो पाठोपाठ मिरची, आलं, फळ भाजीपाला देखील महागला आहे. बेळगावमध्ये भातपिकांसह शेतकरी भाजीपाला पिकवतात यामुळे पालेभाज्यांच्या दरात काहीशी घट दिसून येत आहे.
भाज्यांचे वाढलेले दर पाहून ग्राहकांनीही भाजीपाला खरेदीकडे पाठ फिरविली आहे. कडधान्य आणि बाजारात उपलब्ध असलेल्या मिलमेकर खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढलेला दिसून येत आहे. मात्र एकीकडे भाजीपाल्याचे दर भडकलेले असतानाच दुसरीकडे डाळींचे दरही सातत्याने वाढत असल्याचे निदर्शनात येत आहे. अधिक श्रावणा मासासहित श्रावण मास जवळ आल्यामुळे मांस खरेदी करण्याकडेही नागरिकांचा कल वाढला आहे.
पावसाअभावी पहिल्या टप्प्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे दर वधारतात. मात्र हि परिस्थिती जास्त दिवस राहात नाही. पावसाला सुरुवात झाली कि वधारले दर पूर्वपदावर येतात. यंदा काही ठिकाणी पावसाचा जोर तर काही ठिकाणी पाऊस नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. नाशवंत पिकामध्ये मोडणाऱ्या टोमॅटोचे दर अशावेळी पिकअभावी मोठ्या प्रमाणात वाढतात. अशातच पावसाने पाठ फिरवल्याने भाजीपाल्याचे उत्पादन देखील कमी होत असून भाज्यांचे दर वाढले आहेत. गेल्या पंधरवड्यात भाजीपाल्याचे दर दुपटीने वाढले असून याची झळ आता सर्वसामान्य नागरिकांना सोसावी लागत आहे.
सध्या सोशल मीडियाचा जमाना सुरु आहे. आपल्या अवती भवती घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची दखल नेटकरी घेत असतात. आणि वाढत्या भाजीपाल्याच्या दराचीही दखल नेटकऱ्यांनी घेतली असून यावर अनेक उपहासात्मक रिल्स देखील सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. भाजीपाल्याच्या दरात झालेली वाढ पाहता अनेक भाजी विक्रेत्यांनी कमी प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी ठेवला आहे. पावसाचा जोर वाढला कि हे दर कमी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.