बेळगावचे सुपुत्र आणि नैरोबीया, केनिया येथील वेस्ट लँड्स लेझर आय हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वैभव पेडणेकर यांना तेथील ‘हॉस्पिटल ऑफ द इयर’ आणि ‘डॉक्टर ऑफ द इयर’ या दोन प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
मूळचे राणी चन्नम्मानगर बेळगाव येथील रहिवासी असलेल्या डॉ. वैभव पेडणेकर यांचे सेंट पॉल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण आणि जीएसएस कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण झाले आहे. विजयपुरा येथून डॉक्टरकीची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथे नेत्र चिकित्सेमध्ये स्पेसिलायझेशन केले. आय सर्जन अर्थात डोळ्यांचे शल्य शल्यविशारद असलेल्या डॉ. पेडणेकर यांचे आई वडील डॉ श्रीकांत आणि नंदा पेडणेकर हे बेळगावमध्ये वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे डॉ वैभव पेडणेकर यांच्या पत्नी डॉ. श्रद्धा यादेखील नैरोबिया येथील हॉस्पिटलमध्ये सेवा बजावतात.
वैद्यकीय क्षेत्रातील आय सर्जनपर्यंतच्या आपल्या प्रवासाबद्दल बोलताना डॉ. वैभव पेडणेकर यांनी माझा हा यशाचा मार्ग अनेक आव्हान आणि त्यागाने भरलेला आहे. तथापि अंध रुग्णांना दृष्टी प्राप्त करून देणे आणि त्यामुळे त्यांना झालेल्या आनंदाचा साक्षीदार होणे हे माझ्यासाठी अमूल्य सर्व कांही देऊन जाणारे आहे. हाच माझ्यासाठी मोठा पुरस्कार आहे. मी माझ्या प्रत्येक रुग्णावर स्वतःच्या कुटुंबातील सदस्य समजून उपचार करतो, त्यांची काळजी घेतो, असे सांगितले.