बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील सावगाव रोडवर घालण्यात आलेल्या अशास्त्रीय गतिरोधकामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात येत आहे. अंगडी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी या परिसरात बसविण्यात आलेल्या अशास्त्रीय गतिरोधकामुळे एका तरुणाचा नुकताच अपघात घडला असून येथील गतिरोधक शास्त्रोक्त पद्धतीने बसविले जावेत, अशी मागणी पुढे येत आहे.
सावगाव रोड हा नानावाडी रोडला जोडला गेला आहे. यामुळे टिळकवाडी मार्गावरून येणाऱ्या वाहनधारकांकडून या मार्गाचा वापर केला जातो. नानावाडी मार्गे अंगडी महाविद्यालयाला येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
बहुतांशी विद्यार्थी हे विना हेल्मेट प्रवास करतात आणि याचा फटका त्यांना अशा पद्धतीच्या गतिरोधकांमुळे बसत आहे. एकीकडे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि दुसरीकडे अशास्त्रीय पद्धतीने बसविण्यात आलेले गतिरोधक, यामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. येथील एक गतिरोधक कालच बसविण्यात आला असून या गतिरोधकामुळे एका तरुणाचा अपघातही घडला आहे.
अपघातानंतर आज सकाळी गतिरोधक पांढरे पट्ट्यांनी रंगविण्यात आला असून याठिकाणी आज समाजसेवक संतोष दरेकर यांनी ‘बेळगाव लाईव्ह’टीम सोबत जाऊन पाहणी करत या गतिरोधकांची निर्मिती अशास्त्रीय पद्धतीने झाली असल्याचे सांगितले.
अंगडी महाविद्यालयात येणारे बहुतांशी विद्यार्थी हे या मार्गावर अधिक वेगाने वाहने चालवीत असल्याचेही निदर्शनात आले आहे. या वेगळा आवर घालण्यासाठी आणि नियंत्रण मिळविण्यासाठीच गतिरोधकांची निर्मिती केली जाते. मात्र याठिकाणी निर्माण करण्यात आलेला गतिरोधक हा अशास्त्रीय पद्धतीमुळे जीवघेणा ठरत आहे. याठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात यावेत, अशी मागणी संतोष दरेकर यांनी रहदारी विभागाकडे केली आहे.
या परिसरात अनेक हॉटेल्स आहेत. रात्रीच्यावेळी याच मार्गावरून मद्यपींचा वावर अधिक असतो. यामुळे आसपास परिसरात दारूच्या बाटल्यांचा खचही पडलेला दिसून येत आहे.
शिवाय या मार्गावर पथदीपअभावी संपूर्ण मार्ग अंधारमय झाला आहे. या मार्गावरून येणाऱ्या वाहतुकधारकांसाठी तसेच या मार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी रहदारी पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, पथदीप बसविण्यात यावेत आणि शास्त्रोक्त पद्धतीने गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.