चार दिवसापूर्वी पकडलेल्या ‘इसिस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी निगडित दोघा दहशतवाद्यांच्या पुणे एटीएस पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आंबोलीच्या गर्द जंगलात बॉम्ब स्फोटाची चांचणी करणारे हे दहशतवादी त्याआधी निप्पाणी आणि संकेश्वर परिसरात वास्तव्यास होते असे उघडकीस आले आहे. आता त्यांना आश्रय देणार्यांचीही पुणे पोलिसांनी चौकशी चालवली आहे.
पुणे एटीएस पोलीस पथकाने ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांची नावे मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी अशी आहेत. पोलीस चौकशीत या दहशतवाद्यांनी दिलेल्या माहितीवरून पुणे एटीएस पथकाने गेल्या मंगळवारी आंबोली जंगलात जाऊन बॉम्बस्फोटाची चांचणी घेतलेल्या स्थळाची पाहणी केली.
या पाहणी प्रसंगी कांही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. सदर दहशतवादी तब्बल चार दिवस आंबोलीच्या जंगलात वास्तव्यास होते. पुणे -कोथरूड पोलीस स्थानकाचे कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझ हे गस्तीवर असताना त्यांनी मोटरसायकल वरून जाणाऱ्या मोहम्मद खान व मोहम्मद साकी यांना संशयावरून ताब्यात घेतले होते. मोहम्मद आलम हा त्यांचा तिसरा साथीदार असून तो घटनास्थळावरून फरारी झाला आहे.
पोलीस चौकशीत पकडलेले दोघेही इसिस या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचे स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे सदर दोन्ही दहशतवाद्यांनी आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चांचणी केल्याचे सांगितले. याबरोबरच कोल्हापूर व सातारा भागातील जंगलांमध्ये बॉम्बस्फोटाची चांचणी केल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे.
मोहम्मद खान उर्फ आमिर खान, मोहम्मद साकी आणि मोहम्मद आलम हे तिघेही बॉम्बस्फोटाच्या चांचणीसाठी पुण्याहून आंबोलीकडे निघाले होते. पुणे ते कोल्हापूर -निपाणी -आजरा मार्गे आंबोली असा त्यांनी प्रवास केला. या प्रवासादरम्यान ते कांही दिवस निप्पाणी व संकेश्वर येथे वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतही पुणे एटीएसच्या पथकाने वरील दोन्ही ठिकाणी या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या व्यक्तींची चौकशी चालवली आहे. तसेच दहशतवाद्यांच्या पुणे ते आंबोली दरम्यानच्या प्रवासाचे ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज एटीएसचे कर्मचारी गोळा करत आहेत.