Wednesday, May 8, 2024

/

‘उत्तर’च्या जनतेसाठी 4 हेल्पलाइन सुरू -आम. सेठ

 belgaum

माझ्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनानुसार बेळगाव उत्तर मतदार संघातील जनतेच्या सोयीसाठी मी स्वतःच्या 4 खाजगी हेल्पलाइन अर्थात मदत वाहिन्या सुरू करत असून त्याद्वारे नागरिकांच्या तक्रारी आणि समस्यांची 24 तासात दखल घेऊन त्यांचे लवकरात लवकर निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती बेळगाव उत्तरचे आमदार असिफ उर्फ राजू सेठ यांनी दिली.

शहरात आज शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आमदार सेठ म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये निवडून आल्यास जनतेच्या तक्रारी व समस्या सोडवण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार माझ्या टीमकडून या 4 हेल्पलाइनची निर्मिती करण्यात आली असून त्या जनतेच्या सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. बेळगाव उत्तर मतदार संघातील आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, रस्ते, गटारी, ड्रेनेज, पाणी, वीज वगैरे संदर्भातील तक्रारी व समस्यांची दखल या हेल्पलाइन नंबरद्वारे घेतली जाईल.

त्यानंतर त्या तक्रारी व समस्यांचे त्वरेने निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल. हेल्पलाइनवर तक्रारी येताच त्यांची छाननी करून त्या संबंधित खात्याकडे धान्याद्वारे माझ्या टीमकडून त्यांचा पाठपुरावा केला जाईल. आवश्यक ठिकाणी मी स्वतः पाठपुरावा करून संबंधित समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेन.

 belgaum

सध्याच्या घडीला बेळगाव उत्तरमधील बऱ्याच प्रभागातील नागरिक रस्ते, गटारी, ड्रेनेज आदींच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. या समस्यांचे एक एक करून निवारण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आमच्या हेल्पलाइनवर नागरिकांनी आपली तक्रार अथवा समस्या नोंद करताच आमच्या टीमचे सदस्य तात्काळ प्रत्यक्ष जाऊन माहिती घेतील. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्या अथवा तक्रार लवकरात लवकर निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल. तक्रार अथवा समस्या गंभीर स्वरूपाची असेल तर मी स्वतः याप्रकरणी लक्ष घालून पाठपुरावा करणार आहे. शाळा, आरोग्य, हरित बेळगाव आदींसंदर्भात निवडणुकीपूर्वी मी जी आश्वासने दिली होती त्यांची पूर्तता करण्याचा माझा सर्वतोपरी प्रयत्न राहणार आहे असे सांगून आमचे हेल्पलाइन नंबर दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यान्वित राहणारा असून बेळगाव उत्तर मतदार संघातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. या खेरीज आपत्कालीन परिस्थिती असेल तर नागरिकांनी कोणत्याही वेळी थेट माझ्याशी संपर्क साधावा. माझा फोन 24 तास जनसेवेसाठी उपलब्ध असेल, असे आवाहन शेवटी आमदार राजू सेठ यांनी केले.Asif seth

यावेळी आमदार सेठ यांच्या हेल्पलाइन कक्षाच्या प्रमुखांनी आपल्या 4 हेल्पलाइनच्या माध्यमातून कशा पद्धतीने नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या सोडवल्या जातील याची थोडक्यात माहिती दिली. तसेच हेल्पलाइन नंबर सुरू करण्याचा हा उपक्रम म्हणजे जनता आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच आमदार असिफ उर्फ राजू सेठ यांनी सुरू केलेल्या हेल्पलाइनचे नंबर अनुक्रमे 9686676217, 9686676218, 9686676219 आणि 9686676220 असल्याचे शिवाय त्या फक्त उत्तर मतदार संघासाठी मर्यादित असल्याचे स्पष्ट केले.

पत्रकार परिषदे दरम्यान आमदार सेठ यांनी बिम्स हॉस्पिटल आवारातील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मधील अद्ययावत उपकरणे खरेदी करण्यासाठी सरकारने निधी मंजूर केला असल्याची माहिती दिली. ही उपकरणे बसवून आणि डॉक्टरांची नेमणूक करून जिल्ह्यातील जनतेला लवकरात लवकर चांगले उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. सदर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सदर बाब मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून लवकरच या संदर्भात देखील कार्यवाही होईल, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बेळगाव उत्तर मतदार संघातील शाळांच्या समस्या सोडवण्यासाठी देखील पावले उचलण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.