बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील एपीएमसी कॉर्नरनजीक गेल्या काही महिन्यात अनेक अपघात घडले आहेत. सदाशिवनगर वाय जंक्शन, बॉक्साइट रोड, कंग्राळी खुर्द, कडोली आणि या भागातील सर्व गावांना जोडणारा हा एक प्रमुख चौक असून गेल्या महिन्यात याच चौकात एका वृद्धाचा अपघातात मृत्यू झाला होता.
याठिकाणी रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी किंवा याठिकाणी असलेली सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. अखेर रहदारी विभागाला जाग आली असून एपीएमसी कॉर्नरनजीकची सिग्नल यंत्रणा सुरु करण्यात आली आहे.
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या परिसरात असल्याने दररोज दिवसभर अनेक अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. याचप्रमाणे वेंगुर्ला रोधून बॉक्साइट रोड मार्गे राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांची संख्याही मोठी आहे. या भागातील हा मोठा सर्कल असून चोहोबाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते.
तालुक्याच्या उत्तर भागातील गावातून येणाऱ्या नागरिकांची, शालेय विद्यार्थ्यांचीही वर्दळ या भागात मोठ्या प्रमाणात असते. चोहोबाजूंनी व्यापलेल्या या सर्कलनजीक अनेक अपघात आजपर्यंत घडले आहेत. चोहोबाजूंनी येणारी वाहने वेगाने या मार्गावरून जातात. शिवाय या ठिकाणी रहदारी पोलीस नियुक्त नसल्याने वाहनचालकांचा आलबेल कारभार सुरु असलेला पाहायला मिळतो. मागील महिन्यात अशाच कारणामुळे एका वृद्धाला आपला जीव गमावण्याची वेळ आली होती.
दुचाकीवरून जाणाऱ्या वृद्ध दाम्पत्याला एका कंटेनरने ठोकरले होते. या अपघातात वृद्ध दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. याच भागात एपीएमसी पोलीस स्थानक, पोलीस क्वाटर्स आणि केएसआरपी पोलीस मैदान देखील आहे. मात्र आजतागायत याठिकाणी रहदारी नियंत्रणासाठी कोणतीही पावले उचलण्यात आल्याचे निदर्शनात आले नाही.
या भागात सायकल ट्रॅक ची हि निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या ट्रॅक वरील चेम्बरची झाकणे चोरीला गेली असून हे ट्रॅक देखील धोकादायक बनले आहेत. शिवाय सायकल ट्रॅक संदर्भात जनजागृती करण्यात न आल्याने हे सायकल ट्रॅक वापराविना पडून आहेत. एपीएमसी, बॉक्साइट रोड, उत्तर भागातील तालुक्यातील गावे, राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने जाणारी वाहने अशा सर्व मार्गांना जोडणारा एपीएमसी सर्कल हा दुवा असून याठिकाणी आधीपासून सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली होती.
मात्र रहदारी विभाग आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील सिग्नल यंत्रणा बंद होती. अखेर या सर्कलची सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली असून याबद्दल नागरीकातून समाधान व्यक्त होत आहे.