बेळगाव जिल्हा पंचायत, पदवी पूर्व शिक्षण खाते आणि भारत स्काऊट अँड गाईड बेळगाव जिल्हा शाखा त्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्राध्यापकांसाठीच्या दोन दिवसीय स्काऊट गाईड आणि रोवर रेंजर प्रशिक्षण शिबिराला आज शुक्रवारी सकाळी उत्साहात प्रारंभ झाला.
शहरातील सेंट अँटोनी इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या सभागृहामध्ये आज सकाळी सदर प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री पी.जी.आर. शिंदे शिक्षण खात्याचे धारवाड सहसंचालक आणि भारत स्काऊट गाईडचे बेळगाव जिल्हा मुख्य आयुक्त गजानन मन्नीकेरी बेळगाव जिल्हा भारत स्काऊट गाईडच्या मार्गदर्शिका व पदाधिकारी प्रभावती पाटील, सेंट अँटोनी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर मेरीसिल्डा, स्काऊट अधिकारी राजेश अवलक्की, के. गंगाप्पागौडा व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर प्रमुख पाहुणे पी.जी.आर शिंदे, गजानन मन्नीकेरी, प्रभावती पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी समायोचीत विचार व्यक्त करून शिबिराला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बेळगाव विभागातील विविध सरकारी अनुदानित विनाअनुदानित पदवीपूर्व महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, पालक आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण शिबिर आज आणि उद्या असे दोन दिवस चालणार असून स्काऊट गाईड आणि रोव्हर रेंजरचे तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विशेष असे प्रशिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवणे हा या शिबिराचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळाल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि देशाच्या सक्षमीकरणास मदत होते.
समाजकारण, अर्थकारण, राजकारण, संशोधन अशा विविध क्षेत्रांचा अभ्यास वेळेवर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून सुदृढ समाज निर्मिती करणे, हा देखील या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या दोन दिवसीय शिबिरात सुमारे 450 प्राध्यापक व प्राध्यापिकांनी सहभाग दर्शविला आहे.