दहावीच्या निकालात वाढ होण्यासाठी प्रत्येक शाळेने प्रयत्न करावेत. त्याकरता गेल्यावर्षी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांना मार्गदर्शन करावे अशी सूचना शिक्षण खात्याने सर्व शाळांना केली आहे.
नव्या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या वार्षिक परीक्षेला अद्याप विलंब असला तरी शिक्षण खात्याने पत्रक जाहीर करून सदर परीक्षेबाबत कोणत्या प्रकारच्या उपाययोजना कराव्यात याची माहिती दिली आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्षातील विविध परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहून त्यांना मार्गदर्शन करावे. तसेच अभ्यासात कमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अधिक तास घेऊन मार्गदर्शन करावे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बाबत पालक बैठक घेऊन सूचना कराव्यात. परीक्षेत कॉपीला कोणत्याही प्रकारचा थारा मिळू नये यासाठी जनजागृती करावी. शाळेचा निकाल वाढावा यासाठी मुख्याध्यापक आणि सहशिक्षकांनी अभ्यासाचे नियोजन करावे. विभाग आणि तालुका स्तरावर अधिक स्पर्धात्मक परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.
दहावी परीक्षा कशा प्रकारे घेण्यात येते याबाबत सातत्याने विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. परीक्षा केंद्रावर आत्तापासून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची व्यवस्था करावी.
शैक्षणिक वर्षातील प्रत्येक परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा, अशा सूचनाही शिक्षण खात्याने शाळांना दिल्या आहेत. एकंदर या पद्धतीने आत्तापासून शिक्षण खात्याने दहावीच्या परीक्षेची तयारी सुरू केली आहे.