बेळगाव लाईव्ह : पावसाळ्यात खानापूरसह राज्यातील डोंगराळ भागातील शाळकरी मुले व ग्रामस्थांना नदी ओलांडता यावी यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खानापूर तालुक्यातील भुरणकी या गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त घराची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. नदी ओलांडणे सोयीचे व्हावे यासाठी पाच ते दहा लाख रुपये खर्चून छोटा पूल बांधण्याचा विचार करण्यात आला आहे. तसेच खानापूर तालुक्यात पूल बांधणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. सध्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या घरांना मार्गदर्शक सूचनांनुसार भरपाई दिली जात आहे. पूर्णपणे कोसळलेल्या घरांच्या बांधकामासाठी पाच लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय शासनस्तरावर घेतला जाईल. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी कारवाई केली जाईल. नोव्हेंबरनंतर रस्ता बांधकामाचा आढावा घेतला जाईल, असे सतीश जारकीहोळी म्हणाले.
खानापुरा तालुक्यात ८७ घरांची अंशत: पडझड झाली असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नुकसानीचे प्रमाण वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली असून वेदगंगा- दूधगंगा यासह सर्व नद्यांच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवण्यात आले आहे. आलमट्टी जलाशय भरल्यानंतर आवक लक्षात घेऊन तितकेच पाणी सोडण्यात येईल, असे जारकीहोळींनी सांगितले.
खानापूर तालुक्यातील भुरणकी गावात पावसामुळे घराची भिंत कोसळून झालेल्या घराची पाहणी करून जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दोन कुटुंबांना प्रत्येकी १.२० लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप केले. खेरुन्नीसा हेरेकर आणि गोपाल तरोडकर यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईच्या धनादेशसह अन्नधान्य वितरित करण्यात आले.
यावेळी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकरा, माजी आमदार अंजली निंबाळकर, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, उपविभागीय अधिकारी राजेश नायक, तहसीलदार प्रकाश गायकवाड आदी उपस्थित होते.