Monday, January 27, 2025

/

बळ्ळारी नाला?? नव्हे ओढा….!

 belgaum

बळ्ळारी ओढ्याचा उगम मजगाव येथे आहे. मजगाव जवळून हा ओढा निर्मळपणाने बाहेर वाहत येतो. हा नाला असता तर उन्हाळ्यात सुकला असता. मात्र याला जिवंत झरे असल्यामुळे हा जिवंत झरा असणारा स्वतंत्र ओढा आहे, याचे भान जलसंपदा खात्याने राखणे गरजेचे आहे. कारण अशा पद्धतीच्या ओढ्यांच्या काठावर गावे वसलेली असतात.

आणि ती गावे वसताना त्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमीवर लाभते, प्रत्येक गाव वसताना तेथील लोकांच्या पाण्याच्या गरजेनुसार वसतं. त्यामुळे जुने बेळगाव, वडगाव हि गावे जी वसली ती बेल्लारी ओढ्याच्या पाण्याच्या विपुलतेमुळे. त्यामुळे या ऐतिहासिक जलस्त्रोतांचा निश्चित उपयोग आपल्या भावी पिढीसाठी करणे गरजेचे आहे.

एकेकाळी लंडन शहरात खूप दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. इंग्लंडमधील जवळपास सर्वच नद्या घाणीचे साम्राज्य बनल्या होत्या. पण लोकेच्छा आणि प्रशासकीय इच्छाशक्ती आणि लेखकांनी केलेले आंदोलन यामुळे इंग्लंडमधील सगळ्या नद्या स्वच्छ करण्यात आल्या. स्फटिकाप्रमाणे पाणी निर्माण झाले.

 belgaum

अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ लागली. पाणी हे जीवनदायिनी आहे. त्या पाण्याला जीवन म्हणतात. त्याचे स्रोत अडविणे किंवा नष्ट करणे हि राष्ट्रीय संपत्तीची हानी आहे. त्यामुळे बळ्ळारी नाला हा नाला नसून एखाद्या छोट्या नदीप्रमाणे आहे. हे पवित्र ठिकाण आहे. एकेकाळी या बळ्ळारी ओढ्याचे पाणी लोक पिण्यासाठी वापरत होते. आज त्या पाण्याचे स्वरूप गटारगंगेत करण्यात आले आहे. हा मानवी स्वभावाचा नतद्रष्टपणा आहे. हा ओढा स्वच्छ करून जागोजागी पूल बांधून देखण्या बेळगावच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी या ओढ्याचा उपयोग केला गेला पाहिजे. त्याचबरोबर या पाण्याचा उपयोगही उत्तम कामासाठी झाला पाहिजे.Bellari nala

आज या परिसरातील शेतकरी किंवा बेळगावमधील नागरिक या ओढ्याकडे ज्या घृणास्पद नजरेने पाहतात, ही नजर बदलण्याचे सामर्थ्य बेळगावच्या सध्याच्या पालकमंत्र्यांकडे आहे. त्यांनी या संधीचे सोने करावे, अशी नागरीकातून इच्छा प्रदर्शित होत आहे. याचबरोबर जगभरात ज्यावेळी पाण्यावाचून संघर्ष निर्माण होतील, त्यावेळी आपल्या गावासाठी पाण्याचे अशाप्रकारचे स्रोत आपण जिवंत ठेवणे वरदायिनी ठरणार आहेत. त्यामुळे बेळगावमधील जितके जुने पाण्याचे स्रोत आहेत ते परत व्यवस्थित करून घेणे, स्वच्छता करणे हे गरजेचे आहे.

एकेकाळी असणारा शास्त्रीनगर मधील ओढा आज पूर्णपणे गटारीत बदलण्यात आला, हे आपले दुर्दैव आहे. घाण पाण्याचा निचरा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करून जे निर्मळ पाण्याचे स्रोत आहेत, ते जिवंत राखणे आपले कर्तव्य आहे. जसजसे शहर वाढत जाईल, तसतसा शहराचा पाणीपुरवठा अपुरा होत जाणार आहे. हे भविष्य ओळखून प्रत्येकाने आपल्या घरात असणाऱ्या विहिरी, सार्वजनिक विहिरी, बेळगावमध्ये असणारे छोटेमोठे ओढे, नाले हे व्यवस्थित करून जपणे गरजेचे आहे.

हि काळाची गरज आहे त्याचप्रमाणे दूरदृष्टीचीही गरज आहे. बळ्ळारी ओढा चांगल्या पद्धतीने खोदून दोन्ही बाजूंनी सौंदर्यीकरण करून बेळगाववासीयांना उत्तम पाण्याचा स्रोत तयार करण्याची गरज ओळखून शासनाने युद्धपातळीवर काम करावे, अशी नागरीकातून इच्छा व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.