बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यामध्ये सध्या ग्रामपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचे सत्र सुरू आहे. अनेक ठिकाणी सत्तारूढ काँग्रेसचे, काही ठिकाणी भाजपचे तर कांही ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष -उपाध्यक्ष विराजमान झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या दोनच महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत अध्यक्ष -उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमुळे राजकीय चर्चेला ऊत आला आहे.
ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी कांही ठिकाणी ग्राम पंचायत सदस्यांची फोडाफोडी सुरू आहे, तर कांही ठिकाणी पैशाचे राजकारण सुरू आहे. विजयी उमेदवाराला पैशाने विकत घेऊन तो आपल्याच पक्षाचा असल्याचे भासवत सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून केला जात आहे.
एका गटातून अथवा पक्षातून दुसऱ्या गटात -पक्षात गेलेल्या आणि आपली वचनबद्धता मोडून विरोधकांना मतदान करणाऱ्या सदस्यांना दमदाटी करण्याचे प्रकारही घडत असल्याचे पहावयास मिळत आहे. मतदार सदस्यांनी आपल्या बाजूने मतदान करावे यासाठी प्रथम त्यांना प्रेक्षणीय स्थळांची सहल घडवून त्यांचा चांगला पाहुणाचार करून मतदानाच्या ठिकाणी घेऊन जात अध्यक्ष -उपाध्यक्ष बनवले जात आहेत.
बेळगाव पश्चिम भागातील एका मोठ्या नामांकित ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी पक्षाने आपले वर्चस्व गमावले आहे. त्यामुळे येथील अध्यक्ष -उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच ग्रा. पं. सदस्यांचे मोबाईल तपासणे किंवा पोलिसांकडून त्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे.
एकंदर ग्रामपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने बेळगाव तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. परिणामी बऱ्याच ठिकाणी मोठ्या पोलीस बंदोबस्तात निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागत आहे, हे विशेष!