बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या उलथापालथी होत असून महाविकास आघाडीतून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडली आणि आता त्यापाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये फूट पडून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या या सर्व घडामोडीनंतर कर्नाटकातील राजकारणात विविध चर्चांना ऊत आला असून या राजकीय घडामोडींचे रिंगमास्टर रमेश जारकीहोळी असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ पेटले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ३० आमदारांनी शरद पवार यांच्या विरोधात बंड पुकारले. महाराष्ट्रात सध्या भाजप आणि शिवसेनेचे युती सरकार आहे. मात्र भाजपाच्यावतीने राष्ट्रवादीमध्ये फूट पाडण्यासाठी रमेश जारकीहोळी यांनी महत्वाची भूमिका बजाविल्याचे बोलले जात आहे.
गेल्या १५ दिवसांपासून रमेश जारकीहोळी दिल्लीत तळ ठोकून बसल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून उपलब्ध झाली असून राष्ट्रवादीच्या आमदारांना एकत्र आणण्यामागचे रमेश जारकीहोळी यांनाही भूमिका बजावण्यासाठी देण्यात असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीसाठी महाराष्ट्रातील भाजप नेते थेट दिसल्यास राज्यातील जनतेमध्ये भाजपाबद्दल चुकीचा समज पसरू शकतो यासाठी सावध पवित्रा घेत या कारवाईची जबाबदारी रमेश जारकीहोळी यांच्याकडे काही प्रमाणात जबाबदारी सोपविल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
रमेश जारकीहोळी हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृह मंत्री भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शाह या दोघांशी जवळीक साधून आहेत दोघांच्या विश्वासातील आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात त्यांनी भूमिका बजावली असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्रातील राजकारणाने घेतलेल्या धक्कादायक वळणानंतर कर्नाटकचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी गोकाकला परतले आहेत. यानंतर ते कर्नाटकातील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर गेले असल्याचीही माहिती पुढे आली आहे.