Thursday, January 23, 2025

/

नदीतील वाळू उत्खननावर ऑक्टोबरपर्यंत निर्बंध

 belgaum

बेळगाव लाईव्ह : जिल्ह्यातील सर्व खाण क्रशर, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना १५ जुलैपूर्वी जीपीएस बसवणे बंधनकारक असून, जीपीएस नसलेली वाहने वाहतूक करताना आढळल्यास खाणकामाचा परवाना रद्द करण्याचा कडक इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला.

आज जिल्हा टास्कफोर्स (खनन) कमिटी आणि जिल्हा स्टोन पावडर युनिट्स कंट्रोल कमिटीची बैठक बोलाविण्यात आली होती, या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी उपरोक्त निर्देश दिले आहेत.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, जीपीएस लागू करण्याबाबत पावले न उचलल्यास परवाने रद्द करण्यात येतील. जीपीएस लागू करण्यासाठी १५ जुलैपर्यंत वेळ देण्यात येणार असून १५ जुलैपासून जीपीएसच्या अंमलबजावणीची तपासणी सुरू होईल.

जीपीएस नसलेल्या वाहनांचा परवाना रद्द करण्यात येईल. वाहनांना जीपीएस बसविण्याची जबाबदारी हि क्वारी किंवा क्रशरच्या मालकाची असून जीपीएस विरहित वाहनांच्या वापरावर निर्बंध घालण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जून ते १ ऑक्टोबर या कालावधीत नदीतील वाळू उत्खननाला संधी मिळणार नाही. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत खाणकाम करताना आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे.

या कालावधीत वाळू उत्खनन होत असल्याचे आढळून आल्यास जनतेने पोलिस किंवा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. या काळात केवळ बांधकामासाठी आवश्यक असलेल्या वाळू वाहतुकीला परवानगी दिली जाईल, असे ते म्हणाले. यादरम्यान बेकायदेशीर रित्या खाणकाम करण्यात आल्याचे आढळल्यास खाण आणि भूगर्भशास्त्र विभागातील अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

चालू वर्षात जून महिन्यापर्यंत जिल्ह्यातील अनधिकृत खाण आणि वाहतुकीशी संबंधित एकूण रु. ७३.३६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला असून यापुढील काळात देखील लॅटराइट, वाळू, मुरम आणि दगड खाण यांसह विविध खनिजांच्या अनधिकृत उत्खनन आणि वाहतुकीवर सखोल नजर ठेवून, अवैधरित्या खाण आणि वाहतुकीसंदर्भात बाब आढळून आल्यास निसंकोचपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच याप्रकरणी अधिकाऱ्यांना विशेष पथके तयार करून लक्ष ठेवण्याची सूचनाही करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. खाणकाम व वाळू वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आल्यास पोलीस, महसूल विभाग यांना माहिती देऊन संयुक्त कारवाई करावी, अशा सूचना जिल्हा पोलीस वरिष्ठ अधिकारी डॉ. संजीव पाटील यांनी दिल्या.

वाळू वाहतूक, विना परवाना ओव्हरलोड वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. खाणकाम आणि वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाच्या नोंदी सक्तीने तपासल्या पाहिजेत. योग्य कागदपत्रे नसल्यास कोणत्याही कारणास्तव वाहन वापरण्यास परवानगी देऊ नये, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

प्रत्येक ग्रामपंचायतीला वाळू किंवा जमिनीतून माती वाहतूक करण्यासंबंधीच्या नियमांची माहिती देण्यात यावी, माती वाहतूक करण्यासाठी जिल्हा कार्यदलाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. सार्वजनिक आणि ग्रामपंचायतींनीही याबाबत जागरुक केले पाहिजे, अशा मार्गदर्शक तत्त्वांबद्दल जागरूकता निर्माण करण्याची सूचना डॉ. संजीव पाटील यांनी दिली. या बैठकीत जिल्ह्यातील कल्लू खाणीच्या कंत्राटासाठी प्रलंबित असलेले अर्ज आणि अवैध उत्खनन, वाहतूक यादी याबाबत जनतेने स्वीकारलेल्या तक्रारींबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला चिक्कोडीचे उपविभागीय अधिकारी माधव गीते, बेळगावचे उपविभागीय अधिकारी बाळाराम चव्हाण, बैलहोंगल खाण व भूविज्ञान विभागाचे उपअधिकारी महसूल, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.