खानापूर तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. तर कुसमळी जवळील मलप्रभा नदीच्या प्रवाहात बैल वाहुन गेल्याची घटना घडली आहे.
खानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. गेल्या आठ दिवसापासून पावसाची मुसळधार हजेरी सुरूच आहे. त्यामुळे तालुक्यातील नद्या, नाल्यानी पाण्याची पात्रता ओलांडली आहे. मलप्रभा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
बैलूर (ता.खानापूर) येथील बैलूर खानापूर रस्त्याची या पावसामुळे दयनिय अवस्था झाली आहे.
खानापूर तालुक्यातील हालात्री, मलप्रभा नद्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हेम्माडगा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहतूक मणतुर्गा, असोगा मार्गे खानापूर अशी चालु करण्यात आली आहे. तरीसुध्दा गवाळी, पास्टोली, जामगाव, हेम्माडगा, शिरोली, नेरसा आदी गावाचा खानापूर शहराशी संपर्क तुटला आहे.
खानापूर तालुक्याच्या खेडेगावात अतिवृष्टीमुळे घराची पडझड सुरू झाली असुन भुरूनकी (ता.खानापूर) येथील दोन घरे पडून लाखोचे नुकसान झाले आहे.
गेल्या २५ तासात झालेल्या पावसाच्या नोंदमध्ये कणकुंबी येथे सर्वात जास्त पाऊस झाला असुन १६८.२ मि मि. पावसाची नोंद झाली आहे
तर खानापूर : ५३ . १ मि. मी, नागरगाळी: ७७.८ मि. मी. बिडी: ६२ . ४ मि. मी, कक्केरी: ८३.८ मि.मी.गुंजी: १०६.२ मि. मी, लोंढा रेल्वे: ९३ मि. मी, लोंढा, पीडब्लडी ९८ मि मी, तर जांबोटी: ११२.२मि मी इतकी नोंद झाली आहे.