बेळगाव लाईव्ह : उद्यमबाग परिसरात मंगळवारी रात्री एका दिव्यांग व्यक्तीला पोलिसांनी क्रूरपणे मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ काल दिवसभरात सोशल मीडियावर वायरल झाला असून पोलिसी खाक्याविरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
उद्यमबाग येथील रस्त्यावर एका अपंग व्यक्तीवर लाथाबुक्क्यांनी, लाठीने अंदाधुंद्पणे पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा आणि खाकी क्रूरपणाचा व्हिडीओ वायरल झाला असून इतक्या क्रूरपणे मारहाण करणाऱ्या पोलिसांविरोधात जनतेत संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी कि, मंगळवारी रात्री खानापूर रोड वर एका हॉटेलमध्ये जेवणाचे पार्सल आणण्यासाठी एक इसम गेला होता. यादरम्यान पोलिसांनी त्याच्याकडील मोबाईल, दुचाकी आणि दुचाकीची चावी हिसकावून घेत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेत उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पीएसआय सरदार मुत्तट्टी, हवालदार मल्लप्पा पुजारी, एस. आर. मैत्री या तीन पोलिसांचा समावेश असल्याचे समजते.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या व्हिडिओत ज्याला मारहाण करण्यात येत आहे त्या इसमाची नेमकी चूक काय आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी काही खाजगी वृत्तवाहिन्यांनी सदर इसमाशी संपर्क साधला असता, आपण जेवण आणण्यासाठी गेलो असता समोरून पोलिसांनी आपल्याला थांबवून आपल्याकडील दुचाकी आणि मोबाईल हिसकावून घेतल्याचे या इसमाचे म्हणणे आहे. आपण नशा केली होती हेदेखील कबूल केले, शिवाय पोलिसांची वारंवार माफीही मागितली. आपल्याला घरी जाण्यासाठी पोलिसांनी सांगितले मात्र आपल्याकडील साहित्य हिसकावून घेतल्याने आपण ते मागितले आणि अचानक त्यांनी आपल्याला बेदम मारहाण केली असल्याचे या इसमाने सांगितले.
सदर व्हिडिओमधील इसमाचे विव्हळणे, असह्यपणे किंचाळणे, आपली चूक झाली असल्याचे मेनी करूनही त्याला क्रूरपणे मारहाण करणे हि सारी दृश्ये पाहता मन विचलित होत असून खाकीतील इतकी क्रूरता आजवर केवळ चित्रपटात पाहिली असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीनंतर आपण रात्रभर तेथेच विव्हळत पडलो आणि दुसरे दिवशी सकाळी आपण रिक्षाच्या माध्यमातून घरी पोहोचलो असल्याचे या इसमाने सांगितले आहे.
गेल्या आठवड्यात किल्ला येथील तलावात आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला स्वतःचा जीव धोक्यात घालून रहदारी कॉन्स्टेबलने वाचविले. या घटनेनंतर शहर-परिसरात रहदारी पोलीस कॉन्स्टेबलचा सत्कार करण्यात आला. प्रशंसा करण्यात आली. या घटनेननंतर पोलिसांचा मान वाढला. परंतु मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेत उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी केलेल्या या कृत्यामुळे पोलीस विभागाला पुन्हा शरमेने मान खाली घालावी लागली असल्याचे चित्र आहे.