बेळगाव लाईव्ह : कालपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. खानापूर तालुक्यातील नेरसे या भागात असलेल्या काडंची येथील नागरिकांची धडपड सुरु झाली आहे.
हा भाग जंगल परिसरातील असून याठिकाणी लाकडी झुलता पूल नागरिकांकडून वापरला जातो. खानापूर तालुक्यातील नेरसे ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी नदीवर हा पूल बांधला असून या पुलावरूनच जीव मुठीत घेऊन नागरिकांना चालावे लागत आहे. जिवाच्या भीतीने हा झुलता पूल ओलांडून नागरिकांची कसरत सुरु असून हे चित्र पाहिल्यास अंगावर शहरे आल्याशिवाय राहणार नाहीत.
हा पूल नेरसे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गवळी, पास्तोळी, गवळीवाडा, कोंगळ गावातील लोकांसाठी दळणवळणाचा दुवा आहे. लाकडापासून बनवलेल्या पुलावरून नागरिकांचा गावाशी संपर्क करण्यासाठी धावपळ सुरू आहे. येथील लोकांची बांदुरी नाला ते लाकडापासून बनविलेल्या पुलावरून धोकादायक पायपीट सुरु आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी जीव मुठीत घेऊन हा पूल ओलांडणाऱ्या नागरिकांना पावसाचा जोर वाढल्याने अधिक चिंता सतावत असून हा एकमेव पूल येथील नागरिकांसाठी आधार बनला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला असून अशा वातावरणात धोकादायक स्थितीतून नागरिकांना या पुलावरून जावे लागत आहे. या पुलावरून केवळ पादचारीच नव्हे तर दुचाकी देखील धावतात, हे विशेष. याठिकाणी माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनीही भेट दिली होती. मात्र अद्यापही या पुलाच्या बांधकामाला परवानगी मिळत नसून येथील नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न सुटलेला नाही. वन्यजीव संरक्षित वनपरिक्षेत्राच्या पार्श्वभूमीवर रस्ता पुलाच्या बांधकामाला पर्यावरण विभागाची परवानगी मिळत नसल्यामुळे येथील नागरिकांना दुर्दैवाने अजूनही याच पुलावरून जावे लागत आहे.
गर्भवती महिला, बालक, विद्यार्थी यासह कामानिमित्ताने बाहेर येणाऱ्या नागरिकांना दळणवळणाची सोय उपलब्ध नसल्याने अनेक गोष्टींपासून वंचित राहावे लागत आहे. गर्भवती आणि बालकांना उपचारासाठी जरी यायचे असेल तरी देखील केवळ या पुलामुळे उपचारापासून वंचित राहावे लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी काडंची येथील जनतेने केली आहे. हि परिस्थिती केवळ याच भागात नसून अशापद्धतीने खानापुर तालुक्यातील १० हून अधिक भागात अशीच समस्या आहे. या भागाचे सर्वेक्षण करून न्याय देण्याची मागणी काडंची येथील नागरिकांनसह इतर भागातील वंचित नागरिकांनीही केली आहे.