केएलई हॉस्पिटल समोरील फूटपाथवर अलीकडे मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून रहदारी पोलिसांनी याकडे लक्ष देऊन संबंधित दुचाकी वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
केएलई हॉस्पिटल समोरील फूटपाथवर अलीकडे मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने पार्क केली जात आहेत. ही वाहने कशीही वेडीवाकडी पार्क करून फुटपाथ अडवला जातो.
त्यामुळे सदर फूटपाथ पादचाऱ्यांसाठी आहे की दुचाकी वाहने पार्क करण्यासाठी आहे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. केएलई हॉस्पिटलमध्ये दिवसभर लोकांची मोठ्या प्रमाणात ये -जा सुरू असते. त्यामुळे या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला रांगेने दुचाकी पार्क करण्याची सवलत वाहन चालकांना देण्यात आली आहे. मात्र तरीही अति उत्साही दुचाकी चालक आपली वाहने थेट फूटपाथवर नेऊन पार्क करत आहेत.
दुचाकी वाहनांच्या अडथळ्यामुळे फुटपाथचा वापर करणाऱ्या पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. बऱ्याचदा फुटपाथ दुचाकी वाहनांनी अडवल्यामुळे त्यांना भरस्त्यातून ये -जा करावी लागत आहे.
तरी रहदारी पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच केएलई हॉस्पिटल समोरील फुटपाथवर पार्किंग करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांवर कारवाई करून पादचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.