बेळगाव शहरातील वाहतुकीची कोंडी व पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी मध्यवर्तीय बस स्थानकापासून खडेबाजारमध्ये येणारी वाहतूक बॅरिकेड्स उभारून अडविण्यात आली आहे. केवळ बाजारपेठेतून बाहेर पडण्यासाठी आता या रस्त्याचा वापर होणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा बदल करण्यात आला असून साधक बाधक परिणाम लक्षात घेऊन यासंबंधी ‘वन-वे’चा आदेश जारी करण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी अधिकार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यावर भर दिला आहे. त्यांनी गुन्हे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा व सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर यांना वाहतूक सुधारण्याबाबत सूचना केली आहे.
त्यानुसार कोंडी टाळण्यासाठी खडेबाजारकडे येणाऱ्या मार्गावर एका बाजूला बॅरिकेड्स भारून वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. नित्यानंद सर्कल येथेही उजवीकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
युनियन जिमखानाकडून यंदे खुटकडे येणारे वाहन चालक पोलिस कारवाईच्या भीतीने वनिता विद्यालया मागील बोळातून धर्मवीर संभाजी चौकात बाहेर पडतात.
त्यामुळे त्या ठिकाणीही बॅरिकेड्स उभारून रस्ता बंद करण्यात आला आहे. याखेरीज रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड, अनसुरकर गल्ली व गणपत गल्ली या ठिकाणी वन-वेची कडक अंमलबजावणी केली जात आहे.