बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील वाहतूक गेल्या काही वर्षात प्रचंड प्रमाणात वाढली आहे. परिणामी शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. या समस्येमुळे नागरिक हैराण होत असून आज बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू सेठ) यांनी मनपा आयुक्त आणि मनपा अधिकाऱ्यांसमवेत शनी मंदिर, ताशिलदार गल्ली, पाटील गल्ली, हेमू कलानी चौक, कोनवाळ गल्ली परिसराची पाहणी केली.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी विविध ठिकाणी फ्लायओव्हर निर्माण करण्यात आले आहेत. मात्र फ्लायओव्हर्सच्या बाजूने जाणाऱ्या सर्व्हिस रोड साठी अद्याप कोणतेही नियोजन करण्यात न आल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे.
याचप्रमाणे सर्व्हिस रोडवरील असुविधांमुळे नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शनी मंदिर येथे निर्माण करण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या बाजूचा सर्व्हिस रोड अद्याप करण्यात आलेला नाही. यामुळे या परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
हि बाब लक्षात घेत आज आमदार असिफ सेठ यांनी या परिसरातील विविध भागांची पाहणी करत या भागातील रस्ते आणि गटारीच्या समस्या सोडविण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
यादरम्यान, शनिमंदिराच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी करून या परिसरातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. या भागातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांची लवकरच दखल घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या भागात ६-७ वर्षांपूर्वीची बहुतांश विकासकामे झाली असून, रहिवाशांच्या हितासाठी अनेक गोष्टींची दखल घेण्याची गरज असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले. नागरिकांच्या तक्रारी ऐकून आमदारांनी अधिकाऱ्यांना तातडीने या भागातील समस्या सोडविण्यासाठी सूचना केल्या.