Thursday, January 23, 2025

/

मनपा आयुक्तांची कर्तव्यदक्षता; 10 महसूल कर्मचाऱ्यांना नोटीस

 belgaum

बेंगलोर येथील पथक बेळगाव दाखल झाल्यामुळे शहरातील मिळकतींची माहिती अपलोड करण्याचे काम कोणत्याही स्थितीत 100 टक्के पूर्ण करण्याचा विषय मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी गांभीर्याने घेतला असून त्यांनी शहरातील मिळकतींची केएमएफ 24 प्रणालीत नोंद करण्यात अपयशी ठरलेल्या 10 महसूल कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

शहरातील मिळकतींच्या सर्वेक्षणाची आणि केलेल्या सर्वेक्षणाची माहिती केएमएफ 24 प्रणालीत अपलोड करण्याची मोहीम वर्षभरापासून सुरू आहे. मात्र अद्याप ही मोहीम पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शासनाकडून सदर मोहीम पूर्ण करण्यास पुन्हा डेडलाईन देण्यात आली आहे. नूतन आयुक्त अशोक दुडगुंटी याना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी गेल्या आठवड्यात महसूल विभागाची बैठक घेतली. तसेच सदर काम पूर्ण करण्यासाठी डेडलाईन निश्चित करून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना कामाला लावले. परिणामी सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांना रात्रपाळीही करावी लागेली. मात्र इतके करूनही मनपा महसूल विभागातील 10 कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही.

सदर कर्मचारी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांना थेट कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आता त्या कर्मचाऱ्यांना नोटिसीला उत्तर द्यावे लागणार आहे. उत्तर समर्पक नसेल तर आयुक्त पुढील कारवाई करणार आहेत.

नवे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सुपरिचित आहेत. गेल्या 2019 मध्ये दीड महिना दुडगुंटी हे महापालिका आयुक्त होते.

त्यावेळीही मनपा कर्मचाऱ्यांनी त्यांची धास्ती घेतली होती. आता ते पुन्हा महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाले आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी पहिल्या दिवसापासून महापालिकेचा समस्त अधिकारी व कर्मचारी वर्ग पुन्हा धास्तावला आहे.

महापालिकेत कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदलीची चर्चाही सुरू असून काम चुकारांना दणका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.