उभारली जाणार नवी जिल्हाधिकारी कार्यालय इमारत
राज्याची दुसरी राजधानी म्हणून ओळखला जाणारे आणि अनेक कारणाने विशेष महत्त्व असलेल्या बेळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाची नवी आधुनिक भव्य इमारत उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी जाहीर केली आहे.
सुवर्ण विधानसौर येथे झालेल्या कर्नाटक विकास कार्यक्रमाच्या (केडीपी) त्रैमासिक आढावा बैठकीमध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. सध्या असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील 9 एकर जागामध्ये नूतन इमारत उभे केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. या नियोजित प्रकल्प अंतर्गत 2 एकर जागेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भव्य नूतन इमारती बरोबरच उर्वरित जागेत म्हणजे कार्यालय आवारात पार्किंग सारख्या आवश्यक सोयी सुविधा आणि लँडस्केप गार्डन सुद्धा निर्माण केले जाणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी होण्यासाठी नागरिकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेतल्या जाणार आहेत. या सूचना सदर इमारत पूर्णत्वाला येण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.