बंद अवस्थेतील पथदिपामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करण्यात आलेल्या मंडोळी रोडवर सध्या रात्रीच्या वेळी अपघाताला निमंत्रण देणारे अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांची गैरसोय होत असून येथील पथदीप तात्काळ सुरू करण्याची जोरदार मागणी होत आहे.
कोट्यावधी रुपये खर्च करून केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना बेळगावात राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या विकास कामांच्या दर्जाबद्दल प्रारंभापासूनच साशंकता व्यक्त करून टीका तर होतच आहे. त्याचप्रमाणे पूर्ण झालेल्या विकास कामांच्या देखभालीकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे.
टिळकवाडी येथील मंडोळी रोड हे त्याचे ताजे उदाहरण आहे. हा रस्ता मुळात वादाच्या भोवऱ्यात सापडून प्रदीर्घकाळ पूर्ण करण्यात आला नव्हता. आता तो पूर्ण झाला असला तरी त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या देखभाली अभावी या रस्त्यावरील पथदीप बंदावस्थेत आहेत. त्यामुळे वाहन चालक व नागरिकांची गैरसोय होऊन अपघाताचा धोका वाढला आहे.
पथदिपा अभावी अंधारात रस्त्यावर बसलेल्या मोकाट गायीमुळे काल रात्री या ठिकाणी एका कारला होणारा अपघात सुदैवाने टळला. दैव बलवत्तर म्हणून कारचालकाला शेवटच्या क्षणी रस्त्या मधोमध बसलेली गाय दिसली आणि त्याने गाईला न ठोकरता मोठ्या शिताफीने कार वळवून पुढे नेली.
जर कार सुसाट असती आणि तिने गाईला ठोकरले असते तर अनर्थ घडला असता. तेंव्हा मंडोळी रोडवरील संभाव्य अपघात आणि या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी येथील पथादीप दुरुस्त करून तात्काळ सुरू करावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.