Monday, November 25, 2024

/

अलतग्याला वस्तीची बस सोडा : कंग्राळी खुर्द ग्रा. पं. ची मागणी

 belgaum

गावकरी आणि शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींची गैरसोय टाळण्यासाठी सीबीटी ते अलतगा अशी कायमस्वरूपी वस्तीची बससेवा सुरू करावी अशी मागणी कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली असून तशा आशयाचे निवेदन वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना नुकतेच सादर करण्यात आले.

कंग्राळी खुर्द ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रा. पं. सदस्य चेतक कांबळे, प्रशांत पाटील, राकेश पाटील, वैजनाथ बेन्नाळकर, विनायक कम्मार, यशोधन तुळसकर, चेतन हिरेमठ आदींनी उपरोक्त निवेदन परिवहन अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाचे व्यवस्थापक अनंत शिरगुपकर यांना व जिल्ह्याचे अधिकारी डीटीओ के. के. लमाणी यांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या 6 महिन्यापासून बेळगाव सीबीटी ते व्हाया अलतगा हंदिगनूर बस सेवा अचानकपणे बंद झाली आहे.

त्यामुळे प्रामुख्याने कंग्राळी, अलतगा, ज्योतीनगर परिसरातील शेकडो विद्यार्थी, कामगार, भाजी विक्रेते यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर अलतगा येथील लोकांना जवळपास 1 ते 1. 50 कि. मी. बस पकडण्यासाठी पायपीट करावा लागत आहे. त्याचप्रमाणे ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी स्वतः कांही दिवसापूर्वी जवळपास 50 ते 60 विद्यार्थी बस स्थानकावर बसची वाट बघत थांबल्याचे पाहिले होते.

विद्यार्थ्यांसाठी कोणतीही बस थांबत नसल्यामुळे स्वतः अध्यक्षांनी एक बस थांबवून सर्व विद्यार्थ्यांची सोय करून देण्याबरोबरच त्यांची व्यथा जाणून घेतली होती. त्या अनुषंगाने कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतीने वरील प्रमाणे अलतगा गावासाठी वस्तीच्या बससह कामस्वरूपी बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.Altaga bus

दरम्यान, सध्या राज्य सरकारने महिलांसाठी मोफत प्रवास सुरू केला आहे. मात्र याचा फायदा अलतगा, कंग्राळी व ज्योतीनगर येथील महिलांना होताना दिसत नाही. कारण या ठिकाणी बस नसल्याने महिलांना वडाप व इतर वाहनांवरच अवलंबून रहावे लागते. याची माहिती यापूर्वी परिवहन मंडळाला देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आता तातडीने त्यासाठी पाऊल उचलण्याची गरजही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य मलगौडा पाटील यांनीही परिवहन मंडळाचे डीटीओ लमाणी यांच्याशी संपर्क साधून अलतग्याला वस्तीचे बस सोडण्याची विनंती केली आहे. त्यावर लमाणी यांनी येत्या 4 दिवसात बस सोडण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे विद्यार्थी, कामगार, भाजी विक्रेते व महिलावर्गात समाधान व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.