सुनेला शारिरीक व मानसिक त्रास करून माहेरीहून पैसे घेऊन ये म्हणून तगादा लावत मारहाण करुन घरातून हाकलल्याच्या प्रकरणातून साक्षीदारातील विसंगतीमुळे आरोपी सासूची बेळगाव द्वितीय जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, किणये (ता. जि. बेळगांव) येथील दोन अपत्ये असलेल्या अनुराधा अमोल डुकरे (वय वर्षे 32) हिच्या फिर्यादीनुसार गेल्या पाच-सहा वर्षापासून तिचा पती अमोल याला दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे दररोज घरी येवून पत्नीशी विनाकारण भांडण तंटा काढून मारहाण करत असे. त्यामुळे फिर्यादीनी त्याच्या जाचाला कंटाळून ती माहेरी वडिलांच्या घरी आपल्या मुलांसकट रहायला गेली होती.
त्यानंतर गेल्या 1 जून 2011 रोजी सायंकाळी 7 वाजता फिर्यादी अनुराधा ही आपल्या मुलगीचे शाळेचे ॲडमिशन करण्यासाठी कागद पत्र व दाखला आणण्यासाठी आपल्या सासरी लक्ष्मी गल्ली, किणये येथे आली होती. त्यावेळी सासू जयश्री राजाराम डुकरे (आरोपी क्र. 2) ही घरी होती. तिने फिर्यादीच्या खोलीला लॉक लावले होते. तसेच सासू जयश्री हिने आपला मुलगा अमोल राजाराम डुकरे (आरोपी क्र. 1) याला बोलावून घेतले. त्यावेळी बजरंग राजाराम डुकरे, (आरोपी क्र. 3) हा पण तेथे आला.
सदरी आरोपींनी फिर्यादीला अर्वाच्च शिवीगाळ करण्याबरोबरच अमोल याने फिर्यादीचे मंगळसुत्र तोडुन टाकले व मारहाण केली. तसेच दिर बजरंग याने अर्वाच्च शिव्या देऊन मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्व आरोपींनी तिला घरातून हाकलून काढले व जिवे मारण्याची धमकी दिली.
त्याचप्रमाणे परत यायचे असेल तर माहेरहून पैसे घेऊन ये असे बजावले. त्यावेळी गल्लीतील लोकांनी मध्ये पडून त्यांचे भांडण सोडविले. यासंदर्भात अनुराधा डुकरे हिने बेळगाव महिला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलीसांनी तीनही आरोपींवर भा.द.वि. कलम 498 (अ), 323, 324, 504 व सह कलम 34 प्रकारे गुन्हा दाखल करून त्यांच्यावर न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. न्यायालयात खटल्याची सुनावनी चालु असताना आरोपी क्र. 1 अमोल राजाराम डुकरे व आरोपी क्र. 3 बजरंग राजाराम डुकरे हे मयत झाल्या कारणाने त्यांना न्यायालयाने अबेटेंड म्हणून घोषित केले.
न्यायालयात फिर्यादी व इतर साक्षिदारांची पडताळणी करण्यात आली होती. त्यावेळी साक्षिदारांतील विसंगतीमुळे आरोपी सासू जयश्री राजाराम डुकरे हिची न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने ॲड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.