नंदिनी दुधाच्या दरात प्रतिलिटर 3 रुपये दरवाढ करण्यात आली आहे. कर्नाटक मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (केएमएफ) आपल्या नंदिनी ब्रँडच्या दुधासाठी सरकारकडे 5 रुपये दरवाढ मागितली होती. तथापी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 3 रुपये दरवाढ मंजूर केली आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांसह केएमएफला काहींसा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दूध संघ आणि कर्नाटक मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या (केएमएफ) पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत नंदिनी दूध दरवाढीचा हा निर्णय घेण्यात आला. इतर दुध संघांच्या तुलनेत कर्नाटक मिल्क फेडरेशनची खरेदी फार कमी आहे.
त्याचबरोबर सरकार 5 रुपये अनुदान देत असलं तरी इतर जे स्पर्धक दूध खरेदीदार संघ आहेत त्यांच्याकडून देण्यात येणारा दर प्रचंड जास्त असल्यामुळे कर्नाटक मिल्क फेडरेशनला दुधाचा तुटवडा पडत आहे. त्यामुळे इतर दुग्धजन्य पदार्थ सध्या कर्नाटक मिल्क फेडरेशन तयार करू शकत नाही. कारण दुधाच्या दरातील तफावतीमुळे त्यांना ते परवडत नसल्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर सध्याची 3 रुपयांची दरवाढ केएमएफसाठी देखील दिलासा देणारी आहे. याउलट ग्राहकांच्या खिशावर 3 रुपये दरवाढीचा बोजा पडणार आहे. मात्र दुधाच्या इतर ब्रँड्सच्या तुलनेत नंदिनी दुधाचा वाढीव दर कमीच आहे त्यामुळे नंदिनीच्या विक्रीवर कोणताही परिणाम होणार नाही.
नंदिनी दूध अधिकाधिक ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा फेडरेशनचा प्रयत्न चालू असल्यामुळे दूध दरवाढ जरी झाली असली तरी फेडरेशन निश्चित उपाय योजना आखून नंदिनी दुधाच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची शक्यता आहे. कर्नाटक बरोबरच गोवा, महाराष्ट्र राज्यात नंदिनी दुधाची विक्री चांगल्या प्रमाणात होत असल्याने कर्नाटक मिल्क मार्केटिंग फेडरेशनचा नफा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान नंदिनी दुधाची झालेली प्रतिलिटर 3 रुपये दर वाढ येत्या 1 ऑगस्टपासून लागू होणार आहे.