बेळगाव लाईव्ह :समितीला दुहीचा फटका आहे. दुहीच्या शापामुळेच महाराष्ट्र एकीकरण समितीची पीछेहाट झाली आहे. आज येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायत निवडणुकीत मागील कार्यकाळात समितीची एकहाती सत्ता होती. भाजपचे ११, काँग्रेसचे ३ आणि समितीचे १६ सदस्य अशापद्धतीने समितीने एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य ऐन अध्यक्ष- उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर फुटल्याने येळ्ळूर ग्रामपंचायत समितीच्या हातून निसटली आणि ग्राम विकास आघाडीच्या सदस्येची वर्णी लागली आणि समितीला मात्र उपाध्यक्षपदावर समाधान मानावे लागले.
आज बेळगाव तालुक्यात विविध ग्रामपंचायतींच्या अध्यक्ष – उपाध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत येळ्ळूर ग्रामपंचायतीतील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नावावर निवडणूक लढवून निवडून आलेल्या समितीच्या सदस्यांनी समितीच्या विरोधात मतदान केले. आणि नेहमीप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीला दुहीचे राजकारण भोवले.
मागील महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण मतदार संघात पाच हजार मताधिक्य देणाऱ्या येळ्ळूर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेतृत्व कमकुवत का झाले? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ग्रामपंचायत सदस्यांमध्ये का फूट पडली आणि समितीला अध्यक्षपदापासून का वंचित रहावे? लागले याबद्दल आता विचारमंथन करण्याची वेळ आली आहे.
समितीच्या हातात येळ्ळूर ग्रामपंचायत असूनही, १९ सदस्यांचे बळ असूनही ऐनवेळी समितीला येळ्ळूर ग्रामपंचायत हातातून घालवावी लागली. समितीच्याच काही लोकांनी दुहीचे बीज पेरले आणि समितीच्या नावावर निवडणूक जिंकून आलेल्या आणि भाजपमध्ये समाविष्ट झालेल्या लक्ष्मी भरत मासेकर यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. तर प्रमोद पाटील या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्याची उपाध्यक्षपदी वर्णी लागली.
सीमालढ्याचा केंद्रबिंदू असणाऱ्या येळ्ळूरमधील समितीचा बालेकिल्ला का आणि कसा ढासळला? संख्याबळ अधिक असूनही समितीला का पराभूत व्हावे लागले? येळ्ळूर विभागीय समिती नेतृत्व करण्यात अपयशी ठरली का? असेही प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.