बेळगाव लाईव्ह:विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीला ऍक्टिव्ह करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी बैठकीत घेतला आहे. समितीच्या दक्षिण विभागासाठी कायमस्वरूपी कार्यालय, प्रभागनिहाय समित्या आणि मतदारसंघनिहाय समितीची पुनर्रचना करण्याबाबत कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक रविवारी संध्याकाळी पार पडली.
मराठा मंदिर येथील सभागृहात महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक रणजीत चव्हाण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला सक्रिय करण्याबाबत निर्णय झाला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक रणजित चव्हाण पाटील होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील, श्रीराम सेना हिंदुस्थान समितीचे नेते रमाकांत कोंडूस्कर,नगरसेवक शिवाजी मंडोळकर, महादेव पाटील होते.
या बैठकीत विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र एकीकरण समितीला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानुसार मराठा मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना मराठा मंदिर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दक्षिण विभागासाठी कायमस्वरूपी कार्यालय उपलब्ध करून देण्यात यावे. या मागणीसाठी लवकरच निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर शहरात महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी प्रभागनिहाय कमिटी स्थापन करण्याचा, महाराष्ट्र एकीकरण समितीला बळकटी येण्यासाठी मतदार संघ निहाय पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
खानापूर समितीचे कार्यालय शिवस्मारक भवनात आहे उत्तर मतदार संघात समितीचे कार्यालय रंगुबाई पॅलेस मध्ये ग्रामीण भागाचे समितीचे कार्यालय आहे मात्र दक्षिण बेळगाव साठी समितीचे कार्यालय कुठेच नाही यासाठी मराठा मंदिरात समितीचे जुने असलेले कार्यालय सुपूर्त करा अशी मागणी यावेळी अनेकांनी बैठकीत केली.
बेळगाव शहरात महाराष्ट्र एकीकरण समिती कायम स्वरूपीं कशी कार्यरत राहील यासाठी प्रभाग निहाय कमिटी स्थापन करून कार्य करून कश्या पद्धतीने समिती मराठी समाज बळकट करता येईल यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार करण्यात आला.
मराठा मंदिरात झालेल्या बैठकीत समितीचे काही वरिष्ठ नेते मंडळींनी गैर हजेरी होती त्यासाठी नवीन पुढील बैठकीसाठी समिती नेत्यांना निमंत्रण देऊन देऊन निवेदन देण्याचेही एकमुखी ठरवण्यात आले.
सुरुवातीला युवा कार्यकर्ते सागर पाटील यांनी स्वागत केलं तर महादेव पाटील यांनी प्रास्तविक करून बैठकीचा उद्देश्य स्पष्ट केला.यावेळी समिती नेते रमाकांत कोंडूस्कर,जेष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील, अभय कदम, ज्ञानेश्वर मन्नूरकर,राजू बिर्जे,संजय शिंदे,प्रशांत भातकांडे,रणजित हावळानाचे,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.