बेळगाव लाईव्ह : मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगाव येथे झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दिवंगत रवींद्र महाजनी यांचे वडील ह. रा. महाजनी हे ज्येष्ठ पत्रकार होते.
रवींद्र महाजनी यांचे संपूर्ण बालपण मुंबईत गेले असले तरी त्यांचा जन्म बेळगावात झाल्यामुळे मराठी सिनेसृष्टी गाजविणारा चेहरा बेळगावचा असल्याचे पुढे आले आहे.
शालेय जीवनापासून नाटकात, चित्रपटातच शाळेच्या स्नेहसंमेलनात काम करणाऱ्या रवींद्र महाजनी यांनी खालसा महाविद्यालयामध्ये बी. ए. शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनींना अभिनयाची पहिली संधी मिळाली.
शांतारामबापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी मिळाली. 1974 साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपट सृष्टीला मिळाला होता. त्यांच्या पश्चात गश्मिर महाजनी नावाचा एक मुलगा असून तो देखील चित्रपट क्षेत्रात आघाडीचा अभिनेता आहे. शिवाय रश्मी महाजनी हि त्यांची कन्या असून त्या सध्या बेळगावमध्ये स्थायिक आहेत.
झुंज, मुंबईचा फौजदार, आराम हराम आहे, लक्ष्मीची पावलं, गोंधळात गोंधळ, देव, बेलभंडार, अपराध मीच केला, काय राव तुम्ही यासारखे हिट चित्रपट देणाऱ्या मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह मावळ तालुक्यातील आंबी येथील एका फ्लॅटमधील बंद खोलीत आढळला आहे. शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली.
त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन फ्लॅटचा दरवाजा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला असता रवींद्र महाजनी यांचा मृतदेह आढळला. दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा, असा कयास आहे.७७ वर्षीय रवींद्र महाजनी हे मागील सात ते आठ महिन्यांपासून त्या फ्लॅटमध्ये भाड्याने एकटेच राहत होते असे समजते. रवींद्र महाजनी हे बेळगावमध्येही अनेकवेळा वास्तव्यासाठी येऊन गेले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
हँडसम हंक अभिनेत्याच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. एकेकाळी मराठी चित्रपट सृष्टी गाजविणारे रवींद्र महाजनी यांचे बेळगावशी नाते होते. मराठी सिनेसृष्टीतील एका देखण्या अभिनेत्याचा अशापद्धतीने झालेला अंत पाहून सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.