सालाबाद प्रमाणे मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे आयोजित सभासदांच्या गुणवंत मुला -मुलींचा सत्कार समारंभ आज शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला.
बँकेच्या छ. शिवाजी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार हे होते त्याचप्रमाणे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. चंद्रकांत पोतदार व माजी महापौर मालोजीराव अष्टेकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर बँकेच्या व्हा. चेअरमन निना काकतकर, संचालक बाळासाहेब काकतकर, बाळाराम पाटील, शेखर हंडे, लक्ष्मणराव होनगेकर, विनोद हंगिरकर, मोहन चौगुले, रेणू किल्लेकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुष्पहार घालून पूजन करण्यासह गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रा. चंद्रकांत पोतदार यांनी बँकिंग सारख्या क्षेत्रात कार्यरत असताना मराठा बँकेच्या मंडळींकडे पाहत असताना आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे ही त्यांची भावना फार मोठी आहे. उज्वल यशासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलेच पाहिजे आणि हे काम मराठा बँकेकडून सातत्याने सुरू अत्यंत प्रशासनीय आहे असे सांगून जीवनात यशाबरोबर अपयश पचवण्याची ताकद प्रत्येकाने ठेवली पाहिजे असे सांगितले.
यावेळी मालोजी अष्टेकर यांनी देखील समायोचीत विचार व्यक्त केले. यावेळी प्रमुख वक्त्यांसह व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत स्पृहणीय यश संपादन केलेल्या मराठा बँकेच्या सभासदांच्या गुणी मुला-मुलींचा प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास बँकेच्या सभासदांसह पालकवर्ग, निमंत्रित, हितचिंतक आणि विद्यार्थी -विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.