विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी आता सुरू झाली असून त्या अनुषंगाने जिल्ह्यातील बेळगाव -कित्तूर -धारवाड रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.
सध्या मिरज -लोंढा रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. आता कित्तूर मार्गे बेळगाव ते धारवाड या नव्या रेल्वे मार्गाच्या कामालाही गती मिळत आहे. त्या अनुषंगाने धारवाड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये भूसंपादन सुरू झाले आहे.
आता बेळगाव जिल्हा कार्यक्षेत्रातही ही भूसंपादन प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्गासाठी आरेखन करण्यात आले असून प्रांताधिकार्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
नियोजित बेळगाव -कित्तूर -धारवाड रेल्वे मार्ग बेळगाव, देसुर, येळ्ळूर, नंदीहळ्ळी, के.के. कोप्प, बागेवाडी, एम. के. हुबळी, कित्तूर, कऱ्याकोप्प मार्गे धारवाड असा आहे. सदर 73 कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्ग प्रकल्पाचे काम येत्या 2026 पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.
सदर नव्या रेल्वे मार्गाला देसूर, नंदीहळ्ळीसह त्या भागातील सर्व गावांमधून तीव्र विरोध आहे. हा रेल्वे मार्ग शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीतून घेऊन न जाता पडीक जमिनीतून नेण्यात यावा, अशी मागणी आहे. मात्र प्रशासकीय पातळीवर प्रकल्प रेटून धरण्यात येत आहे.
त्यामुळे कांही शेतकऱ्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. परिणामी मध्यंतरी या प्रकल्पाची कार्यवाही थंडावली होती. मात्र आता खासदार आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी पुन्हा कार्यवाहीचे संकेत दिले आहेत.