भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी बेळगाव महापालिकेचे नुतन आयुक्त अशोक दुडगुंटी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्याबरोबर त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आयुक्तांशी शहर उपनगरातील विविध विषयांवर चर्चा करून जनतेला भेडसावणाऱ्या नागरी समस्या निवारणाची विनंती केली.
महापालिका आयुक्तांच्या भेटी प्रसंगी बेळगाव शहर परिसरात डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतुनाशक औषधांची फवारणी करावी. बंद पडलेली प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ववत सुरू करून रुग्णांसाठी उपचाराची सोय उपलब्ध करून द्यावी.
तसेच बेळगाव महापालिकेकडे पुरेशा शववाहीका उपलब्ध नसल्याने लोकांची गैरसोय होत आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन महापालिकेने पुरेशा शववाहीका खरेदी कराव्यात अशी विनंती जाधव यांनी केली.
शववाहिका खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या अडचणीचे असेल तर महापालिकेने सेवाभावी संस्थांना आवाहन करून देणगीरूपाने सेवाभावी संघटनांकडून शववाहिका उपलब्ध करून घ्याव्यात, असा सल्लाही किरण जाधव यांनी आयुक्तांना दिला.
शहरातील अस्वच्छता आणि गढूळ वातावरणामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकूनगुणिया सारख्या रोगांनी उच्छाद मांडला आहे. याची दखल घेत महापालिका आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या फॉग मशीनचा योग्य वापर करून शहर आणि उपनगरात जंतुनाशक औषधांची फवारणी करावी. याखेरीज बेळगाव शहर आणि परिसरातील बंद पडलेली सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ववत सुरू करून लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी किरण जाधव यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.
त्यावर बोलताना महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी समस्यांची पाहणी करून सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल अशी ग्वाही दिली.