बेळगाव उत्तर विभागाचे उपनोंदणी कार्यालय आपल्या अनागोंदी व मनमानी कारभारामुळे सातत्याने चर्चेत असते. आज देखील त्याचे प्रत्यंतर आले जेंव्हा या कार्यालयातील कामकाज दुपारी चक्क 12:30 वाजण्याच्या सुमारास सुरू झाले. परिणामी सकाळपासून ताटकळत थांबलेल्या नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
बेळगाव उत्तर विभागाचे उपनोंदणी कार्यालय आज दुपारी 12 वाजले तरी बंदच होते. कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे शुकशुकाट पसरला होता. नियमानुसार सरकारी कार्यालयांचे कामकाज सकाळी 10:30 वाजता सुरू व्हावे लागते.
मात्र दुपार झाली तरी उत्तर विभाग उप नोंदणी कार्यालयात कर्मचाऱ्यांचा पत्ता नव्हता. त्यामुळे या कार्यालयाशी संबंधित कामांसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अनेक जण भर पावसात उभे राहून सदर कार्यालयातील कामकाज सुरू होण्याची प्रतीक्षा करताना दिसत होते. त्यामुळे उपनोंदणी कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली होती. या पद्धतीने सकाळपासून कार्यालयासमोर गर्दी झालेली असताना उपनिबंधकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सखेदाश्चर्य व्यक्त होत होते.
पूर्वी एकाच ठिकाणी असलेल्या उपनोंदणी कार्यालयात नागरिकांची एकच गर्दी होत असल्यामुळे या कार्यालयाचे बेळगाव उत्तर आणि बेळगाव दक्षिण असे दोन वेगवेगळे विभाग करण्यात आले. यापैकी उत्तर विभाग उपनोंदणी कार्यालयाच्या बाबतीत नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत.
सदर कार्यालय आज चक्क दुपारी 12 वाजेपर्यंत बंद असल्यामुळे त्रस्त झालेल्या काही नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सदर कार्यालयातील कांही कर्मचारी आपल्या बदलीच्या कामानिमित्त तर काही न्यायालयीन कामासाठी अशा वेगवेगळ्या कारणामुळे अद्याप कामावर हजर झाले नसल्याची माहिती देण्यात आली. नागरिक त्रस्त झालेले असताना दुपारी 12 नंतर एकेक कर्मचारी येण्यास सुरुवात झाली आणि अखेर 12:30 वाजता बेळगाव उत्तर उप नोंदणी कार्यालयाचे काम नेहमीप्रमाणे सुरू झाले.
संबंधित कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे आपल्या कामाची पूर्तता करण्यासाठी सकाळपासून कार्यालयासमोर ताटकळत उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता.