बेळगाव लाईव्ह : हिरेकुडी येथील नंदी पर्वत आश्रमातील जैनमुनी कामकुमार नंदी महाराज हत्या प्रकरणातील आरोपी नारायण माळी आणि हसनसाब दलायत यांना मंगळवारी चिक्कोडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर आज चिक्कोडीचे डीवायएसपी बसवराज यलीगर यांच्या नेतृत्वाखाली आरोपींची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपली वैयक्तिक डायरी जाळल्याचा दावा नारायण माळी या आरोपीने केला आहे. मात्र सदर डायरीत काय आहे याबाबत त्याने स्पष्ट माहिती दिली नाही. आपल्याकडून चूक झाली असून आपल्याला गोळी घालून ठार करण्यात यावे अन्यथा आपण आत्महत्या करू असा इशाराही पोलीस चौकशीदरम्यान सदर आरोपाने दिला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
जैन मुनींच्या हत्येमागील मुख्य कारण शोधण्यासाठी पोलिसांनी सखोल तपास सुरु केला असून आर्थिक व्यवहार हे खुनाचे कारण आहे कि खुनामागे काही अन्य हेतू होता? याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरु केला आहे.
नंदीपर्वत आश्रमात शाळा उभारणीच्या कामादरम्यान नारायण माळी यांची जैन मुनींशी ओळख झाली होती. नारायण माळी या आरोपीने बांधकामासाठी वाळू व इतर साहित्याचा पुरवठा केला होता.
कोविड काळात काही अपरिहार्य कारणांमुळे प्राथमिक शाळा बंद करण्यात आली होती. हिरेकुडी गावात भाडेतत्त्वावर जमीन नांगरणाऱ्या नारायण माळी याने अडचणीत सापडल्यानंतर जैन मुनींकडे आर्थिक मदत मागितली होती, अशीही माहिती उपलब्ध झाली आहे.