मंडोळी, हंगरगा गावांसाठी नव्या बस गाड्या उपलब्ध करून देण्याबरोबरच बसेसची संख्या वाढवावी अशी मागणी ग्रामपंचायत मंडोळी, हंगरगा आणि मंडोळी ग्रामपंचायत सदस्यांसह गावकऱ्यांनी केएसआरटीसी बेळगाव विभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
मंडोळी, हंगरगा ग्रा. पं. सदस्यांच्या शिष्टमंडळाने उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी केएसआरटीसी बेळगाव विभागीय अधिकारी के. के. लंमनी यांना सादर केले. निवेदन स्वीकारून विभागीय अधिकाऱ्यांनी आवश्यक सर्व माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
मंडोळी व हंगरगा गावासाठी सध्या दोन बस गाड्यांची सेवा सुरू असली तरी या बस कधीच वेळेवर येत नाहीत. याखेरीज या दोन्ही बसेस सुस्थितीत नसून जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे प्रवासात त्या वारंवार बंद पडून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे पावसाळ्यात या बस गाड्यांना गळती लागते.
परिणामी शालेय विद्यार्थी आणि अन्य प्रवाशांना खूप त्रास होतो. याची दखल घेऊन मंडोळी व हंगरगा गावासाठी नव्या बसेस उपलब्ध करून देण्याबरोबरच बसेसची संख्या देखील दोन वरून चार इतकी वाढवावी. सदर मागणीची लवकरात लवकर पूर्तता केली जावी अन्यथा नाईलाजाने आंदोलन छेडावे लागेल, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा शि. होसकोटी, केदारी ध. कणबरकर, यल्लाप्पा ब. पाटील, लक्ष्मी ल. कणबरकर, निवृत्ती मा. तळवार, मिना बा. गोडसे, लक्ष्मी श. पाटील, गायत्री पी. पाटील, सुभाष प. तळवार, लक्ष्मण भ. कणबरकर आदी उपस्थित होते.