अनमोड मार्गे बेळगाव -पणजी राष्ट्रीय मार्गाचे संपूर्ण बांधकाम तसेच बरलकोड नजीकच्या टोल नाका उभारणीचे काम अद्याप पूर्ण झाले नसताना घिसाड घाईने उद्या मंगळवारी 11 जुलैपासून गणेबैल टोल नाक्याच्या ठिकाणी टोल वसुलीची प्रक्रिया सुरू करण्याचा जो निर्णय घेतला तो कितपत योग्य आहे? असा संतप्त सवाल केला जात आहे. त्याचप्रमाणे वाहनधारकांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या या निर्णयाविरुद्ध आंदोलन छेडून आवाज उठवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
बेळगाव -पणजी व्हाया अनमोड या राष्ट्रीय महामार्गाचे गोवा हद्दीपर्यंतचे काम गेल्या 2011 पासून सुरू झाले. आता त्याच्या नोटिफिकेशनला एक दशक उलटून गेले तरी या महामार्गाचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत आहे. या पद्धतीने महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसतानाही खानापूर -बेळगाव महामार्गावरील गणेबैल टोल प्लाझा अर्थात टोल नाक्यावर वाहन कर (टोल) वसुली करण्याची प्रक्रिया उद्या मंगळवारी 11 जुलै रोजी सकाळी 8 वाजल्यापासून हाती घेतली जाणार आहे.
खानापूर ते बेळगाव या 26 कि.मी. अंतरापैकी केवळ 16.5 कि.मी. महामार्गाचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे तथापि उर्वरित महामार्गाचे काम अर्धवट आहे. वास्तविक हालगा बायपास महामार्ग ते गोवा सरहद्दीपर्यंत येणाऱ्या एकूण 84 कि.मी. महामार्गावर 50 कि.मी. अंतरावर दोन टोल नाके उभारले जाणार आहेत. गणेबेल टोल नाका आणि बरलकोड जवळील टोल नाका असे हे दोन टोल नाके असणार आहेत. मात्र यापैकी बरलकोड नजीकच्या टोल नाक्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. वास्तविक अनमोड मार्गे बेळगाव -पणजी या राष्ट्रीय महामार्गाचे कर्नाटक हद्दीतील काम गेल्या बारा वर्षापासून रेंगाळत सुरू आहे. या राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित हालगा -मच्छे बायपास रस्त्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याखेरीज होनकल ते रामनगर मार्गे गोवा सरहद्दीवरील अनमोड पर्यंतच्या रस्त्याचे काम ही अर्धवट अवस्थेत आहे. की सध्या परिस्थिती असताना गणेबैल येथे टोल वसुली करून वाहनचालक व मालकांचा खिसा कापण्याचा प्रकार संबंधित कंपनीकडून केला जात असल्याचा आरोप होत आहे.
सदर महामार्ग बांधकामाचे कंत्राट मिळालेल्या अशोका बिल्डकॉन कंपनीने बेळगावपासून खानापूर पर्यंतचे रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. मात्र अनमोडपर्यंतच्या रस्त्याचे आणि हालगा बायपास रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. सध्या गणेबैल टोल प्लाझा जवळील 16.5 कि.मी. रस्ता पूर्ण झाल्यामुळे तो वापरात असल्यामुळे वाहनचालकांच्या डोळ्यात धुळफेक करून टोल वसूल करण्याचे काम बिल्डकॉन कंपनी उद्यापासून हाती घेणार आहे. वास्तविक नियमानुसार 84 कि.मी. अंतराच्या या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्याखेरीज टोल वसुलीची प्रक्रिया राबवता येत नाही. तथापि हा नियम पायदळी तुडवत घिसाड घाईने 16.5 कि.मी. अंतराच्या रस्ता वापराचे शुल्क आकारण्याचा अन्यायकारक प्रकार संबंधित कंपनीकडून केला जात आहे. याव्यतिरिक्त सदर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन करण्यात आले आहे. त्यापैकी बहुतांश जणांना अद्याप नुकसान भरपाईही मिळालेली नाही.
या संदर्भात अनेक प्रकरणी न्यायप्रविष्ठ आहेत. मात्र दुसरीकडे आता बिल्डकॉन कंपनी शेतकऱ्यांच्या जमिनीतून गेलेल्या रस्त्याद्वारे आपली कमाई करणार असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच उद्यापासून सुरू होणाऱ्या टोल वसुली प्रक्रियेला संबंधित शेतकरी तीव्र विरोध करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच सदर टोल वसुलीला लोकप्रतिनिधींसह सर्वांनीच विरोध करणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.