Sunday, December 29, 2024

/

100 वर्षे जुन्या हिंडलगा जेलचा ‘असा हा’ इतिहास

 belgaum

ब्रिटिशांनी 1923 मध्ये प्रशस्त 99 एकर जमिनीमध्ये पसरलेल्या आणि फाशीचे तीन स्तंभ असलेल्या हिंडलगा जेल अर्थात हिंडलगा मध्यवर्तीय कारागृहाचे बांधकाम केले. तब्बल 1,162 कैदी सामावू शकतील इतक्या क्षमतेचे हे कारागृह बेळगावच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक असून जे शहरापासून सुमारे 6 कि.मी. अंतरावर वसले आहे.

कर्नाटकातील विविध कारागृहांपैकी एक असलेले हिंडलगा मध्यवर्तीय कारागृह हे हिंडलगा जेल म्हणूनही ओळखले जाते, जे सर्वात प्रसिद्ध आणि अत्यंत सुरक्षित अशा सुधारात्मक सुविधांच्या बाबतीत सर्वोच्च तसेच अभेद्य मानले जाते. ब्रिटिशकालीन तीन फाशीच्या स्तंभांमुळे हिंडलगा जेल हे राज्यातील एकमेव असे कारागृह आहे जेथे फाशीची शिक्षा अंमलात आणली जाते. कुख्यात गुन्हेगार, कच्चे कैदी, जंगल लुटारू आणि संशयित सिमी कार्यकर्ते हे या कारागृहाची हवा खात असतात. हिंडलगा जेलला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. कारण एकेकाळी स्वातंत्र्याच्या चळवळी दरम्यान या कारागृहाने देशातील महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्यासारख्या प्रमुख राष्ट्रीय नेत्यांना आपल्या ताब्यात ठेवले होते. ब्रिटिशांच्या राज्यात प्रमुख लष्करी तळ म्हणून कार्यरत राहिलेले हिंडलगा कारागृह बेळगाव मधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात महत्त्वाची भूमिका निभावत असते. जेंव्हा गांधी आणि नेहरू यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांना कारागृहात डाबण्याची गरज निर्माण झाली, त्यावेळी 1923 मध्ये फाशीचे तीन स्तंभ असलेल्या आणि 1,162 कैदी क्षमतेच्या हिंडलगा जेलची स्थापना झाली. हिंडलगा कारागृहात कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विनायक दामोदर सावरकर यांचाही समावेश होता. त्यांनी 4 एप्रिल 1950 पासून 13 जुलै 1950 पर्यंत म्हणजे 100 दिवस कैदेची शिक्षा भोगली. विशेष म्हणजे याच कारागृहात असताना त्यांना फाशीच्या शिक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले. हिंडलगा कारागृहात फाशीची शिक्षा झालेल्या शेवटच्या कैद्याचे नांव हनुमाप्पा मरियाप्पा मारियाळ (रा. गोकाक) असे आहे. हनुमाप्पा याच्यावरील 5 जणांच्या खूनाचा आरोप सिद्ध झाल्याने त्याला गेल्या 9 नोव्हेंबर 1983 रोजी हिंडलगा जेलमधील फाशीच्या स्तंभावर लटकवण्यात आले. तत्पूर्वी 1976 मध्ये 6 जणांना तर 1978 मध्ये अन्य 5 जणांना या कारागृहात फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.

हिंडलगा मध्यवर्तीय कारागृह 99 एकरमध्ये पसरले असून यापैकी जवळपास 30 एकर जमीन शेतीसाठी आणि जनावरांच्या कुरणासाठी वापरली जाते. हिरवळीने समृद्ध अशा या कारागृहाचा परिसर झाडांनी समृद्ध असून त्यामधील मोकळ्या जागेत झाडेझुडपे व वनस्पती आहेत. हे नैसर्गिक वातावरण अबाधित राखून त्याचे संवर्धन करण्याचे काम कारागृहाचे अधिकारी, कर्मचारी आणि कैद्यांकडून केले जात असते.

सदर कारागृह म्हणजे समोरासमोर अशी दोन मोठी संकुल आहेत. यापैकी एका संकुलात शिक्षा झालेल्या पुरुष कैद्यांसाठीच्या बराकी आहेत, तर दुसरे संकुल कच्च्या कैद्यांसाठी आहे. शिक्षा झालेल्या कैद्यांच्या विभागात त्यांच्यासाठीची कामाची जागा आणि बराकिंचा समावेश आहे. कामाच्या जागेमध्ये पावरलूम, हैंडलूम, टेलरिंग आदी सुविधा आहेत. कच्चा कैद्यांच्या विभागात कोठड्या आणि बराकी आहेत. यामध्ये वाचनालय, सुतारकाम कक्ष, टेलरिंग विभाग यांच्यासह अतीसुरक्षा आवश्यक असलेल्या कैद्यांसाठीच्या कांही खास कोठड्या देखील आहेत. अतिउच्च सुरक्षा व्यवस्था आवश्यक असलेल्या अटकेतील लोकांसाठी येथे वेगळा विभागही आहे. या ठिकाणीच देहांताची शिक्षा सुनावलेल्या कैद्यांना आपले शेवटचे कांही दिवस व्यतीत करण्याबरोबरच आपल्या अंतिम इच्छा पूर्ण करून घ्याव्या लागतात. या विभागातून एका छोट्या गेटमधून कर्नाटकातील एकमेव कार्यरत फाशीच्या स्तंभांकडे मार्ग जातो.

HIndlga jail
Belgaum hindlga jail

ब्रिटिशांविरुद्धची असहकाराची चळवळ आणि दांडी यात्रेच्या काळात फक्त बेळगाव भागातीलच नव्हे तर जवळपासच्या प्रदेशातील असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना हिंडलगा कारागृहात डांबण्यात आले होते. या ऐतिहासिक कारागृहाच्या ठिकाणी कन्नड चित्रपट ‘मीनचीन ओट’ आणि हिंदी चित्रपट ‘मोहरा’ यासारख्या कांही चित्रपटांचे चित्रीकरण देखील झाले आहे. हिंडलगा जेल हे फक्त त्याच्या ऐतिहासिक महत्त्व आणि सिनेमॅटिक अपीलसाठी प्रसिद्ध नसून काही वाईट कारणांसाठी देखील ते प्रसिद्ध झोतात आले आहे. या कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनी बाहेरील जगातील व्यक्तींना धमकीचे फोन केल्याची उदाहरणे आहेत. ताजे धक्कादायक उदाहरण म्हणजे अलीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी आलेले धमकीचे फोन बेळगावच्या हिंडलगा जेल मधूनच केले गेले होते. पोलीस तपासात या कृत्यामागचा प्रमुख सूत्रधार कुविख्यात लष्कर-ई-तोयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेचा सदस्य अफसर पाशा हा असल्याचे उघड झाले आहे. ही बाब हिंडलगा कारागृहातील चिंताजनक हालचालींवर प्रकाश टाकणारी आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.