बेळगाव लाईव्ह : सरकारी यंत्रणेला जोवर हलवून जागे करण्यात येत नाही तोवर सरकारी यंत्रणा आणि सरकारी यंत्रणेत काम करणारे अधिकारी निद्रितावस्थेतच आढळून येतात.
बेळगावमधील विविध नागरी समस्यांवर प्रकाशझोत टाकत निद्रितावस्थेतील अधिकारी आणि यंत्रणेला जागे करण्यासाठी बेळगाव लाईव्ह नेहमीच प्रयत्नशील असते. याच माध्यमातून रविवारी अलारवाड क्रॉस वरील एक वृत्त प्रकाशित करण्यात आले. आणि ताबडतोब या वृत्ताची दखल घेण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे अलारवाड क्रॉस येथील रस्त्याशेजारी चार-पाच विजेचे खांब गेल्या तीन चार दिवसापासून पाण्याने भरलेल्या शेतामध्ये कोसळले होते. तक्रार करून देखील दखल न घेणारे हेस्कॉम या ठिकाणी जीवित हानी झाल्यानंतरच दुरुस्तीचे काम हाती घेणार का? असा संतप्त सवाल कृष्णा संताजी या शेतकऱ्यांसह इतर शेतकऱ्यांनी केला होता.
हि बातमी शनिवारी बेळगाव लाईव्ह ने प्रकाशित केली आणि अखेर हेस्कॉमला याची जाग आली असून या वृत्ताची दखल घेत सोमवारी पडलेले खांब बाजूला सारून तुटलेल्या वायर्स जोडण्यात आल्या आहेत.
विजेच्या तारांसकट शेतातील पाणी भरलेल्या गाद्यांमध्ये पडलेल्या या खांबामुळे शेतात कामास येणारे शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना शेतकरी कृष्णा संताजी यांनी सांगितले की, गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असून आजपर्यंत वारंवार तक्रार करून देखील हेस्कॉमचे अधिकारी व कर्मचारी आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहे.
सध्या शेतीच्या कामांचे दिवस आहेत. अशा परिस्थितीत कोसळलेल्या विजेच्या खांबांमुळे आम्हाला जीव मोठे धरून काम करावे लागत आहे. गेले चार दिवस झाले अजूनही विजेचे खांब पूर्ववत उभारून दुरुस्ती करण्यात आलेली नाही असे सांगून हेस्कॉमच्या बेजबाबदारपणाबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच शेतात कोसळलेल्या विजेच्या खांबामुळे जीवित हानी झाल्यास त्याला कोण जबाबदार? असा सवालही केला. याचप्रमाणे अलारवाड क्रॉस येथील अन्य शेतकऱ्यांमध्ये देखील हेस्कॉमच्या बेजबाबदार कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.
बेळगाव live च्या बातमीचा परिणाम…शेतात पडलेल्या अवस्थेतील ते धोकादायक खांब हटवले… @HubliHescom ला आली जाग…. pic.twitter.com/fFQUCWshx3
— Belgaumlive (@belgaumlive) July 24, 2023
या प्रकरणाची दखल लोकप्रतिनिधींसह हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेऊन अलारवाड क्रॉस येथील शेतवाडीत कोसळलेल्या धोकादायक विजेच्या खांबांची युद्धपातळीवर दुरुस्ती करून ते पूर्ववत सुरक्षित उभे करावेत आणि शेतकऱ्यांना जीवदान द्यावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली होती.
हि मागणी उचलून धरत बेळगाव लाइव्हने वृत्त प्रकाशित केले आणि या वृत्ताची दखल घेत तातडीने या ठिकाणचे खांब बाजूला सारून पूर्ववत करण्यासाठी काम सुरु करण्यात आले असून याबाबत नागरीकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.