बेळगाव शहरातील हेमू कलानी चौकात रस्त्याशेजारी टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची गांभीर्याने दखल घेत नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांनी आज सकाळी त्या ठिकाणी कचरा टाकण्यास मनाई असल्याचा फलक उभारून परिसरातील नागरिक आणि व्यवसायिकांनी आपला कचरा रस्त्यावर न टाकता घंटागाडीकडे सुपूर्द करावा, असे आवाहन केले आहे.
शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या हेमू कलानी चौक येथील रस्त्याशेजारी गेल्या कित्येक महिन्यापासून परिसरातील नागरिक तसेच दुकानदार, हॉटेल चालक व अन्य व्यावसायिकांकडून केरकचरा टाकला जात होता.
त्यामुळे त्या कचऱ्याची उचल होईपर्यंत अस्वच्छता आणि दुर्गंधीचे वातावरण पसरवून हेमू कलानी चौकाला बकाल स्वरूप प्राप्त झाल्याचे पहावयास मिळत होते. या पद्धतीने उघड्यावर रस्त्याशेजारी कचरा टाकू नये यासाठी वेळोवेळी जनजागृती करून देखील चौकात केरकचरा टाकणे सुरूच होते. याची गांभीर्याने दखल घेत प्रभागाच्या नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी आज शनिवारी सकाळी हेमू कलानी चौकात स्वच्छता मोहीम राबवून कचऱ्याची उचल करावयास लावली.
तसेच त्या ठिकाणी कचरा टाकण्यास प्रतिबंध असल्याचा महापालिकेचा फलकही उभारला. त्याचप्रमाणे परिसरातील नागरिक, हॉटेल चालक आणि दुकानदारांनी आपल्याकडील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घंटागाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आज सकाळी राबविण्यात आलेली स्वच्छता मोहीम आणि कचरा प्रतिबंधात्मक फलक उभारणीप्रसंगी नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्यासह सिद्धार्थ भातकांडे, मनपा आरोग्य निरीक्षक शिवानंद भोसले, बीट पर्यवेक्षक कांबळे, ईसाई आदी उपस्थित होते. हेमू कलानी चौकात या पद्धतीने कचरा टाकण्यास प्रतिबंध केल्याबद्दल जागरूक नागरिकांमध्ये नगरसेविका भातकांडे यांची प्रशंसा होत आहे.