राज्य सरकारच्या गृहज्योती योजनेअंतर्गत या महिन्यातील नांव नोंदणीची अंतिम मुदत 27 जुलैला समाप्त झाले आहे. त्यामुळे या तारखेपर्यंत ज्यांनी नांव नोंदविले नाही त्यांना ऑगस्टमध्ये जुलै महिन्याचे बिल भरावे लागणार आहे.
गृहज्योती योजने करिता नांव नोंदणीसाठी अंतिम तारीख नसली तरी दरमहा एक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार 27 जुलै पर्यंत अंतिम मुदत होती. या मुदतीत ज्यांनी नांव नोंदणी केली आहे त्यांना ऑगस्टपासून 200 युनिट मोफत विजेचा लाभ मिळेल.
मोफत वीज योजनेचा लाभ देण्यापूर्वी मागील 12 महिन्यातील सरासरी वीज बिल ग्राह्य धरून त्यात 10 टक्के अधिक वीज बिलाचा समावेश करून मोफत वीज पुरवण्यात येणार आहे. आता पात्र लाभार्थींना ऑगस्टपासून या योजनेचा लाभ मिळेल. नियमानुसार 200 युनिट पेक्षा कमी विजेचा वापर केल्यास ग्राहकांना कोणत्याही स्वरूपाचे वीज बिल आकारण्यात येणार नाही.
दरम्यान, 28 जुलै ते 27 ऑगस्ट या कालावधीत सदर योजनेअंतर्गत नांव नोंदणी करणाऱ्यांना सप्टेंबरमध्ये योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही सेवा केंद्र किंवा बेळगाव -वन केंद्रात जाऊन नोंदणी करून घेता येते.
त्याचप्रमाणे खाजगी संगणक केंद्र किंवा स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीने नांव नोंदवून योजनेचा लाभ घेता येईल. गृहज्योती योजनेअंतर्गत अर्ज करण्यात आल्यानंतर त्याच्या माहितीसाठी https//sevasindhu.karnataka.gov.in यावर क्लिक करून ट्रॅक स्टेटसला भेट देता येईल.