गांधीनगर येथे गॅस सिलेंडरमधील गळतीमुळे आगीचा भडका उडून गंभीर जखमी झालेल्या बस चालकाचा खाजगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला असून त्याच्या पत्नीची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.
उपचाराचा फायदा न होता मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी बस चालकाचे नाव मंजुनाथ नरसाप्पा अथणी (वय 40, रा. सुभाष गल्ली गांधीनगर) असे आहे. गेल्या शनिवारी सकाळी कामावर जाण्याच्या घाईत गॅस पेटवताना आगीचा भडका उडून गांधीनगर येथील एकाच कुटुंबातील चौघेजण भाजून गंभीर जखमी झाले होते.
या जखमींपैकी मंजुनाथ याचा गेल्या शनिवारी रात्री उशिरा मृत्यू झाला असून त्याची पत्नी लक्ष्मी (वय 36) हिची प्रकृती चिंताजनक आहे. दुर्घटनेत अथणी दांपत्यांची वैष्णवी (वय 13) आणि साईकुमार (वय 10) ही दोन मुले देखील भाजली गेली होती, मात्र त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
आगीच्या या दुर्घटनेची माळ मारुती पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. दरम्यान बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी काल रविवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
त्याचप्रमाणे अग्निशामक दलाकडून आगीचा भडका नेमका कशामुळे उडाला? याचा शोध घेतला जात आहे.