बेळगावचा उत्कृष्ट फुटबॉलपटू मुळचा शहापूर सध्या रामदेव गल्ली येथील रहिवासी प्रतीक प्रेमानंद बर्डे याचे काल गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले. निधनसमयी त्याचे वय अवघे 31 वर्षे होते.
प्रतीकच्या पश्चात आई-वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे. सदाशिवनगर स्मशानभूमी येथे आज सकाळी नातलग, शहरातील फुटबॉलपटू आणि बहुसंख्य क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले.
कॅम्प येथील सेंटपॉल हायस्कूलचा माजी विद्यार्थी असणारा प्रतीक बर्डे हा शहरातील एक नावाजलेला फुटबॉलपटू होता. विविध फुटबॉल स्पर्धांमध्ये आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात प्रतीकचे मोलाचे योगदान असायचे.
हसऱ्या मनमिळाऊ स्वभावामुळे तो आपल्या सहकारी खेळाडूंमध्ये प्रिय होता. प्रतीक बर्डे यांच्या अकाली निधनामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याचे सहकारी आणि फुटबॉल प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.