जून महिन्यातील आपली गैरहजेरी भरून काढताना गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. परिणामी पंधरा दिवसांपूर्वी कोरडे असलेले नदी -नाले आता दुथडी भरून वाहत असून चिक्कोडी व निपाणी तालुक्यातील सात बंधारे तसेच विविध पूल पाण्याखाली गेल्यामुळे तेथील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
चिक्कोडी तालुक्यात दूधगंगेचे पाणी झपाट्याने वाढत असून प्रशासनाकडून जनतेला सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. नद्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे निपाणी तालुक्यातील कारदगा -भोज, भोजवाडी -कुन्नूर, सिदनाळ -अक्कोळ, जत्राट -भिवशी, ममदापूर -हुन्नरगी, कुन्नूर -बारवाड तर चिकोडी तालुक्यातील मलिकवाड -दत्तवाड असे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
त्याचप्रमाणे बारवाड -कुन्नूर, गोकाक -सिंगलापूर, राजपूर -मंगावती हे पूल पाण्यात बुडाले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशावरून या बंधारे व पुलांवरील वाहतूक बॅरिकेड्स टाकून बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. दूधगंगा नदीवरील सदलगा -बोरगाव आणि एकसंबा -दानवाड हे पूल सध्या तरी वाहतुकीसाठी खुले आहेत.
सध्या जिल्ह्यातील घटप्रभा, हिरण्यकेशी, कृष्णा, मलप्रभा, दूधगंगा, वेदगंगा, मार्कंडेय या नद्या दुथडी भरून वाहू लागले आहेत. आणखी काही दिवस दमदार पाऊस झाल्यास जलाशय देखील तुडुंब भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, बेळगाव शहर परिसरात गेल्या सलग चार दिवसापासून जोराचा पाऊस बरसत आहे. आज देखील अधून मधून उघडीत देत पावसाच्या जोरदार सरी कोसळतच आहेत. जोरदार पावसामुळे साऱ्यांची तारांबळ उडत आहे. गेल्या तीन दिवसात पावसाचा जोर अधिकच वाढल्यामुळे शहरातील सखल भागामध्ये पाणी साचले आहे. भाग्यनगर दुसरा क्रॉस रिक्षा स्टॅन्डच्या ठिकाणी संपूर्ण रस्त्यावर पाण्याचे तळे निर्माण झाल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे. साफसफाई अभावी बहुतांश ठिकाणच्या गटारी तुंबल्या असून गटारीचे पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांना रस्त्यावरून इजा करताना कसरत करावी लागत आहे. पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून रस्ते खराब झालेल्या ठिकाणी खडी आणि चिखलाचे साम्राज्य पसरलेले पहावयास मिळत आहे. जोराच्या वाऱ्यासह संततधार पावसामुळे काल भाग्यनगर सहावा क्रॉस येथे एक झाड कोसळून दोन चार चाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच राकसकोप रोडवर बेनकनहळ्ळी नजीक मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
नदी -नाले तुडुंब भरून वाहू लागल्यामुळे विविध ठिकाणचे पूल व बंधारे पाण्याखाली जाण्याबरोबरच मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रस्ते खचत आहेत. ड्रेनेज पाईपलाईनसाठी केलेले खोदकाम व्यवस्थित न बुजवल्यामुळे शहरातील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेनजीकचा रस्ता खचून मोठा खड्डा पडला आहे. त्याचप्रमाणे येळ्ळूर रोड हा रस्ता एका ठिकाणी खचण्यास सुरुवात झाला आहे. या ठिकाणी रस्त्याकडेला जमिनीला मोठी भेग पडण्यास सुरुवात झाली असून जे या मार्गावरून ये -जा करणाऱ्या वाहन चालकांसाठी धोकादायक ठरू शकते.
दमदार पावसामुळे जलाशयातील पाणीसाठा वाढवून पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्यास मदत झाली आहे. राकसकोप, हिडकल, हिप्परगी, अलमट्टी व नवलतीर्थ या जलाशयांमधील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. या पावसामुळे सर्व पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तथापि कांही ठिकाणी पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून ते बांधावरून वाहत आहे. त्यामुळे येळ्ळूर वगैरे शिवारांमध्ये शेतामध्ये पाण्याचे छोटे धबधबे निर्माण झालेले पहावयास मिळत आहेत. पावसाचा भात लावणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. या खेरीज बटाटा तसेच इतर पिकांनाही हा पाऊस पोषक ठरला आहे. मात्र पूर्ण वाढ झालेल्या भाजीपाला व टोमॅटो पिकाला पावसाचा फटका बसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.